#INDvNZ 1st Test | न्यूझीलंडविरुद्ध भारताचेच पारडे जड

आजपासून कानपूरच्या ग्रीन पार्कवर रंगणार पहिली कसोटी

कानपूर – प्रमुख खेळाडूंची विश्रांती तसेच काही खेळाडूंना झालेली दुखापत यांमुळे चिंतेत भर पडलेली असली तरीही आजपासून (गुरुवार) न्यूझीलंडविरुद्ध सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीत यजमान भारतीय संघाचेच पारडे जड राहणार आहे. या उलट न्यूझीलंडला त्यांच्या फलंदाजांच्या अपयशातून बाहेर येण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.

भारत व न्यूझीलंड पहिली कसोटी

ठिकाण – ग्रीन पार्क, कानपूर
वेळ – सकाळी 9-30 वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस

सातत्याने क्रिकेट खेळल्यामुळे नियमित कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली असल्याने तसेच रोहित शर्मानेही या मालिकेतून माघार घेतल्यामुळे अजिंक्‍य रहाणेकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्यातच सलामीवीर फलंदाज लोकेश राहुललाही दुखापत झाल्यामुळे त्यालाही या सामन्यात खेळता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतीय संघात अनुभवी खेळाडूंपेक्षा नवोदितांचीच संख्या जास्त झाली आहे.

तरीही भारतीय संघाचेच या सामन्यावर वर्चस्व राहणार आहे. घरच्या मैदानावर भारतीय संघाला पराभूत करणे अत्यंत कठीण असून भारताच्या फिरकी गोलंदाजीचा सामना करण्याचेच आव्हान न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर राहणार आहे.

खेळपट्टीबाबत संभ्रम

भारतातील खेळपट्ट्या या कायमच फिरकी गोलंदाजीला साथ देणाऱ्या ठरतात. मात्र, या ग्रीन पार्क मैदानावरील खेळपट्टी नव्याने तयार करण्यात आल्यामुळे पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांना त्याचा लाभ होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. अर्थात, सध्या हिवाळा सुरू होत असल्याने खेळपट्टीवरील दवामुळे नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्‍यता जास्त आहे.

पुजारा व रहाणेकडूनच जास्त अपेक्षा

गेल्या दीड वर्षांपासून एक ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेचा अपवाद वगळता संघातील सर्वात तंत्रशुद्ध फलंदाज कर्णधार रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्याकडून मोठी खेळी झालेली नाही. या दोन कसोटींच्या मालिकेत मात्र, भारतीय संघाच्या फलंदाजीची मुख्य जबाबदारी त्यांनाच वाहावी लागणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा व राहुल या सामन्यात खेळणार नसल्याने पुजारा व रहाणे यांच्यावरच मदार आहे.

सलामीवीरांकडून अपेक्षा

मयंक आग्रवालच्या साथीत सलामीला कोण खेळणार हा प्रश्न अद्याप कायम असला तरीही न्यूझीलंडच्या अनुभवी वेगवान गोलंदाजीचा सामना करताना भारताला मोठी सलामी मिळणे अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. आग्रवालसह शुभमन गिल डावाची सुरुवात करेल असे सांगितले जात आहे. तसेच सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. केवळ फलंदाजीचा निकष लावला तर यादवलाच संधी मिळण्याची शक्‍यता जास्त आहे.

न्यूझीलंड संघ परिपूर्ण

कर्णधार केन विल्यमसन, मार्टिन गुप्टील, ग्लेन फिलिप्स, टॉम ब्लंडल, हेनरी निकोल्स अशी तगडी फलंदाजी त्यांच्याकडे आहे. टीम साउदीच्या जोडीला केल जेमिसन, मिचेल सॅंटनर, नेल वॅगनर अशी भेक गोलंदाजीही भारतीय फलंदाजांसाठी त्रासदायक ठरेल. भारतीय संघाचे बलाबल पाहता न्यूझीलंडचा संघ जास्त परिपूर्ण वाटतो. मात्र, प्रत्यक्ष मैदानावर कोण कशी कामगिरी करतो हेच महत्त्वाचे ठरेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.