India Alliance | Rahul Gandhi | Trinamool Congress – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पराभवाचा परिणाम आता राष्ट्रव्यापी इंडिया आघाडीवर दिसून येत आहे. तृणमूल काँग्रेसने याचे संकेत दिले आहेत. मंगळवारी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांना कमकुवत नेता म्हटले आहे. त्यामुळे आघाडीत सर्व ठिकठाक राहणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
काँग्रेस हरियाणा किंवा महाराष्ट्रात अपेक्षित निकाल मिळवण्यात अपयशी ठरली आहे. आम्हाला काँग्रेसकडून खूप अपेक्षा होत्या की ते अधिक चांगली कामगिरी करतील. इंडिया आघाडी आहे पण अपेक्षित परिणाम साधता आले नाहीत आणि तिथे भाजपच्या विरोधात लढण्यात काँग्रेसचे मोठे अपयश आहे. आज जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढायचे असेल इंडिया आघाडी भक्कम असण्याची गरज आहे व त्यासाठी इंडिया आघाडीला सक्षम नेत्याची गरज असल्याचे एएनआयशी बोलताना कल्याण बॅनर्जी यांनी सांगितले.
दरम्यान, याआधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीतही तृणमूल कॉंग्रेस गैरहजर राहीली. आमचे नेते कोलकाता येथे त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत व्यस्त होते असे पक्षाकडून सांगण्यात आले असले तरी परंतु तृणमूलला संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे महत्व माहिती होते आणि म्हणूनच त्यांची अनुपस्थिती धक्कादायक होती. कल्याण बॅनर्जी यांनी तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीच्या नेत्या बनवायला हवे अशी स्पष्ट मागणीच केल्यामुळे आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
खासदार कल्याण बॅनर्जी यांनी काँग्रेसला आपला अहंकार दूर करावा आणि मुख्यमंत्री बॅनर्जी यांना इंडिया ब्लॉकचा चेहरा म्हणून स्वीकारावे असे आवाहन केले. वारंवार पराभव होऊनही ते (काँग्रेस) त्यांचा अहंकार सोडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जबाबदारी का देत नाहीत? फक्त त्याच भाजपसाठी मृत्यूची घंटा वाजवू शकतात असा दावाही बॅनर्जी यांनी केला.