नवी दिल्ली – 2030 साली होणाऱ्या युवा ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारत उत्सूक असून याचबरोबरीने आमचे लक्ष्य हे 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदावर असल्याचे भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले.
ते बोलताना पुढे म्हणाले, भारत 2030 मध्ये युवा ऑलिम्पिकसाठी बोली लावण्यासाठी तयार आहे, जे 2036 मध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन सुरक्षित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असेल. 2030 मध्ये पाचव्या युवा ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे.
भारताने नेहमीच ऑलिम्पिकच्या क्षणांचा आणि त्याच्याशी निगडित क्रीडा भावनेचा आदर केला असल्याचे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ. पी.टी. उषा यांनी सांगितले. भारताव्यतिरिक्त पेरू, कोलंबिया, मेक्सिको, थायलंड, मंगोलिया, रशिया, युक्रेन, बोस्निया आणि हर्जेगोविना हे देशही युवा ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत आहेत.