इस्लामाबाद : शांघाय सहकार्य संघटनेंतर्गत विविध यंत्रणांमध्ये भारत सक्रिय सहभागी असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ते इस्लामाबादमध्ये आज दाखल झाले. रवाना होण्यापूर्वी त्यांनी हे प्रतिपादन केले. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला जवळपास दशकभरानंतर दिलेली ही पहिली भेट आहे. दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले असताना जयशंकर पाकिस्तानला गेले आहे.
शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आज दुपारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर इस्लामाबादेत पोचले. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला ते उपस्थित राहिले. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीमध्ये आपण केवळ संघटनेच्या कामापुरते सहभागी होणार असून यानिमित्ताने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दर यांच्याबरोबर कोणतीही द्विपक्षीय चर्चा होणार नाही, असे जयशंकर यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयांनीही याला दुजोरा दिला आहे. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा स्वाभाविकपणे होणे अपेक्षित आहे. भारताला पाकिस्तानबरोबर निश्चितच चांगले संबंध अपेक्षित आहेत. मात्र सीमापार दहशतवादाच्या मुद्याकडे दुर्लक्ष करून हे संबंध सर्वसामान्य केले जाऊ शकणार नाहीत. दहशतवाद आणि शत्रूत्वमुक्त वातावरण निर्माण करणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे, असे जयशंकर अलिकडच्या काळात म्हणाले होते.
दीर्घकाळापासून कोणतेही संबंध नाहीत…
भारत आणि पाकिस्तान दरम्यान काश्मीर आणि सीमापार दहशतवादाच्या मुद्यावरून संबंध ताणलेले आहेत. पाकिस्तानला भेट देणाऱ्या शेवटच्या भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज होत्या. डिसेंबर २०१५ मध्ये अफगाणिस्तानवरील परिषदेत सहभागी होण्यासाठी त्या इस्लामाबादला गेल्या होत्या. तेंव्हापासून गेल्या ९ वर्षात भारताच्या कोणत्याही परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला भेट दिली नव्हती.
२०१९ च्या फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानातील जैश ए मोहंम्मदच्या तळांवर भारतीय लढाऊ विमानांनी हवाई हल्ला केला होता. तेंव्हापासून बिघडलेले संबंध भारताने ५ ऑगस्ट २०१९ ला राज्यघटनेतील ३७० वे कलम रद्द केल्यावर आणखीनच बिघडले होते. गेल्या वर्षी पाकिस्तानचे तत्कालिन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जी-२० च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी गोवा येथे आले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी १२ वर्षांनी भारताला भेट दिली होती.