बेंगळुरू – सौरभ कुमारसह अन्य गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारत अ संघाने तिसऱ्या अनधिकृत कसोटीत रविवारी न्यूझीलंडच्या अ संघाचा 113 धावांनी पराभव केला. (India A Won by 113 Run) या विजयासह भारत अ संघाने तीन कसोटी सामन्यांची ही मालिका 1-0 अशी जिंकली. पहिले दोन्ही कसोटी सामने अनिर्णित राहिले होते.
India A Won by 113 Run(s) #IndAvNzA #IndiaASeries Scorecard:https://t.co/SK5tF43NOb
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 18, 2022
या सामन्यात भारताच्या अ संघाने आपल्या पहिल्या डावात 293 धावा करत न्यूझीलंड अ संघाचा पहिला डाव 237 धावांवर संपवला होता. त्यानंतर भारताच्या अ संघाने आपला दुसरा डाव 7 बाद 359 धावांवर घोषित केला व न्यूझीलंडसमोर विजयासाठी 416 धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंडचा दुसरा डाव 302 धावांवर संपुष्टात आणत भारताने 113 धावांनी सामना जिंकला.
न्यूझीलंडकडून जो कार्टरने अफलातून शतकी खेळी केली. त्याला साथ देताना मार्क चॅपमनने 45 तर, डेन क्लेव्हरने 44 धावांची खेळी केली. मात्र, अन्य फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.
भारताकडून या कसोटी मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या तसेच पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या सौरभ कुमारने दुसऱ्या डावात 5 गडी बाद केले व विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला साथ देताना सर्फराज खानने 2 गडी बाद केले. आता या दोन संघात तिन एकदिवसीय अनधिकृत सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.