शहबाज नदीमचे पाच बळी; विंडीज सर्वबाद 228

भारत ‘अ’ संघ मजबूत स्थितीत 

नॉर्थ साऊंड – फिरकी गोलंदाज शहबाज नदीमने घेतलेल्या पाच विकेट्‌समुळेच भारत “अ’ संघाने वेस्ट इंडिज अ’ संघाविरुद्ध आपली बाजू भक्‍कम केली. या संघांमधील पहिल्या अनधिकृत क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी विंडीजच्या 228 धावांना उत्तर देताना भारताने 1 बाद 70 धावा केल्या.

विंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. भारताच्या द्रुतगती गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यापुढे त्यांचा निम्मा संघ 97 धावांत कोसळला. मात्र, राहकिम कॉर्नवॉल व जेर्मिनी ब्लॅकवुड यांनी अर्धशतके टोलविली. त्यामुळेच त्यांना दोनशे धावांचा टप्पा ओलांडला आला.

मोहम्मद सिराजने त्यांचे सलामीचे फलंदाज जेरेमी सोलोझानो (9) व मॉंटकिन हॉज (16) यांच्या विकेट्‌स घेतल्या तर त्याचा सहकारी शिवम दुबेने कर्णधार शॅमऱ्ह ब्रुक्‍स (12) याला बाद केले आणि विंडीजला धक्‍का दिला. ब्रुक्‍सचा झेल यष्टीरक्षक रिद्धीमान साहाने घेतला. भारताच्या वरिष्ठ कसोटी संघातही त्याला संधी देण्यात आली आहे. येथील सामना त्याच्यासाठी सराव सामना आहे.

नदीमने रोस्टोन चेस (25) व जाहमार हॅमिल्टन (16) याला बाद करीत वेस्ट इंडिजला अडचणीत टाकले. कॉर्नवॉल व ब्लॅकवुड यांनी सहाव्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. कॉर्नवॉलने 7 चौकार व 3 षटकारांसह 59 धावा केल्या. ब्लॅकवुडने 53 धावा करताना 6 चौकार मारले. या दोघांना नदीमने बाद करीत पुन्हा भारताची बाजू बळकट केली. भारताचा दुसरा फिरकी गोलंदाज मयांक मार्कंडेय याने दोन गडी बाद करीत विंडीजचा डाव संपुष्टात आणला.

भारताच्या अभिमन्यू ईश्‍वरन व प्रियांक पांचाळ यांनी सलामीसाठी 61 धावांचा पाया रचला. ही जोडी मोठी भागीदारी रचणार असे वाटत असतानाच ईश्‍वरन 28 धावांवर बाद झाला. जोमेल वॉरिकेनने त्याला बाद केले. पहिल्या दिवसअखेर खेळ थांबला त्यावेळी पांचाळ व शुभमन गिल हे अनुक्रमे 31 व 9 धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक

वेस्ट इंडिज अ’ पहिला डाव 66.5 षटकांत सर्वबाद 228 (राहकिम कॉर्नवॉल 59, जेर्मिनी ब्लॅकवुड 53, शहबाज नदीम 5-62, मोहम्मद सिराज 2-61, मयांक मार्कंडेय 2-40)
भारत “अ’ पहिला डाव 22 षटकांत 1 बाद 70 (प्रियांक पांचाळ खेळत आहे 31, अभिमन्यु ईश्‍वरन 28, जोमेल वॉरिकेन 1-9)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.