नॉर्थ साऊंड – डावखुरा फिरकी गोलंदाज शहबाज नदीमने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही पाच विकेट्स घेतल्या. त्यामुळेच भारत “अ’ संघाला वेस्ट इंडिज अ’ संघाविरूद्ध विजयाची संधी मिळाली आहे. विजयासाठी 97 धावांचे आव्हानास सामोरे जाताना त्यांनी दिवसअखेर 1 बाद 29 धावा केल्या.
वेस्ट इंडिजने पहिल्या डावात केलेल्या 228 धावांना उत्तर देताना भारताने पहिल्या डावात 312 धावा करीत 84 धावांची आघाडी मिळविली. रिद्धीमान साहने शैलीदार खेळ करीत 66 धावा केल्या. त्यानंतर नदीम व वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्या प्रभावी माऱ्यापुढे वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 180 धावांत आटोपला.
भारताने 8 बाद 299 धावसंख्येवर पहिला डाव पुढे सुरू केला. मात्र आणखी 13 धावा काढून त्यांचा डाव आटोपला. मिग्वेल कमिन्सने साह याला बाद करीत भारताला मोठी आघाडी मिळविण्यापासून वंचित ठेवले. कमिन्सने 40 धावांत 4 विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या मॉंटसिन हॉज (36), रोस्टोन चेस (32), शामराह ब्रुक्स (53) व जेर्मिनी ब्लॅकवुड (25) यांच्या दमदार खेळामुळे त्यांची 4 बाद 159 अशी भक्कम स्थिती होती. ब्रुक्स व चेस यांनी दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. हॉजने 5 चौकार मारले तर चेसने 2 चौकारांबरोबरच एक षटकारही मारला.
ब्रुक्सच्या अर्धशतकात 7 चौकारांचा समावेश होता. वेस्ट इंडिज या डावात किमान 250 धावांची मजल गाठणार अशी अपेक्षा होती. मात्र, नदीमला सूर गवसला आणि त्याच्या अचूक माऱ्यापुढे त्यांच्या डावाची घसरगुंडी झाली. नदीमने या डावात 47 धावांत 5 गडी बाद केले. त्याने या सामन्यात 109 धावांमध्ये 10 विकेट्स मिळविल्या. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. प्रियांक पांचाळ 5 धावा काढून तंबूत परतला. दिवसअखेर अभिमन्यु ईश्वरन 23 धावांवर खेळत होता.
संक्षिप्त धावफलक- वेस्ट इंडिज “अ’ 228 व 77 षटकांत सर्वबाद 180 (शामराह ब्रुक्स 53, मॉंटसिन हॉज 36, रोस्टोन चेस 32, शहबाज नदीम 5-47, मोहम्मद सिराज 3-38)
भारत “अ’ 312 व 104.3 षटकांत 312 (शिवम दुबे 71, रिद्धीमान साह 66, मिग्वेल कमिन्स 4-40)