भारत ‘अ’ संघाची विजयी सांगता

अँटिग्वा – सलामीवीर ऋतुराज गायकवाडचे शतक केवळ एक धावेने हुकले. मात्र, त्याच्या चमकदार खेळामुळेच भारत ‘अ’ संघाने वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरूद्धचा पाचवा एक दिवसीय सामना 6 विकेट्‌सने जिंकला आणि या दोन संघांमधील एक दिवसीय सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली.

वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 47.4 षटकांत 236 धावा केल्या. त्यामध्ये शेर्फीन रूदरफोर्ड (65) व सुनील ऍम्ब्रीस (61) यांच्या शैलीदार खेळाचा समावेश होता. भारताने केवळ 33 षटकांमध्ये व दोन गड्यांच्या बदल्यात हे आव्हान पार केले. त्यामध्ये गायकवाड (99), शुभम गिल (69) व श्रेयस अय्यर (नाबाद 61) यांनी महत्त्वाची कामगिरी केली. या मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून भारताने विजयी आघाडी घेतली होती. चौथा सामना विंडीजने जिंकला होता.

वेस्ट इंडिजचा सलामीचा फलंदाज ऍम्ब्रीसने 52 चेडूंमध्ये 61 धावा करताना 7 चौकार व 2 षटकार अशी फटकेबाजी केली. मात्र त्यानंतर भारताच्या प्रभावी माऱ्यापुढे त्यांची बिनबाद 77 धावसंख्येवरून 6 बाद 103 अशी घसरगुंडी झाली. त्यावेळी त्यांचा डाव दीडशे धावांमध्ये गुंडाळला जाणार अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यांच्या रूदरफोर्डने झंझावती फलंदाजी खेळ केला व संघाला आश्‍वासक धावसंख्या रचण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याने 4 चौकार व 4 षटकारांसह 61 धावा केल्या. त्याला खॅरी पिअरीने नाबाद 35 धावा करीत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून दीपक चहार व राहुल चहार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

भारताच्या गायकवाड व गिल यांनी सुरूवातीपासून आक्रमक खेळ करीत सलामीसाठी 11.4 षटकांत 110 धावांचा पाया रचला. गिलने 8 चौकार व 3 षटकारांसह 69 धावा केल्या. गायकवाडने 89 चेडूंमध्ये 99 धावा करताना 11 चौकार व 3 षटकार अशी टोलेबाजी केली. किमो पॉलच्या षटकांत पिअरीने त्याचा झेल घेतला. त्यांनी विजयाचा पाया रचल्यानंतर अय्यरने 64 चेडूंमध्ये नाबाद 61 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 3 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता.

संक्षिप्त धावफलक :

वेस्ट इंडिज‘ 47.4 षटकांत सर्वबाद 236 (शेर्फीन रूदरफोर्ड 65, सुनील ऍम्ब्रीस 61, खॅरी पिअरी नाबाद 35, दीपक चहार 2-39, राहुल चहार 2-53) भारत ‘अ’ 33 षटकांत 2 बाद 237 (ऋतुराज गायकवाड 99, शुभम गिल 69, श्रेयस अय्यर नाबाद 61)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)