#T20WorldCup | भारतासमोर विजयासाठी 133 धावांचे आव्हान

अश्‍विन व जडेजाने घेतली नामिबियाची फिरकी

दुबई – आयसीसीटी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धीतील सुपर 12 गटातील लढतीत भारतीय संघातील अव्वल फिरकी द्वयी रवीचंद्रन अश्‍विन व रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीसमोर नामिबियाचा डाव 8 बाद 132 धावांवर रोखला गेला.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चक्क 17 सामन्यांनंतर नाणेफेक जिंकली. हा सामना कोहलीच्या नेतृत्वातील अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना असल्याने आपल्या नेतृत्वाची अखेर गोड करण्यासाठी भारतीय संघ विजय प्राप्त करण्यासाठी सज्ज बनला आहे.

यंदाच्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतून भारतीय संघ यापूर्वीच बाहेर पडला आहे.
नामिबियाचे सलामीवीर स्टीफन बार्ड आणि मायकेल व्हॅन लिंजेन यांनी 33 धावांची सलामी दिली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने लिंजेनला 14 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या क्रेग विल्यम्सला रवींद्र जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर जडेजाने सलामीवीर बार्डला 21 धावांवर पायचीत केले. यानंतर जडेजा व अश्विनने नामिबियाला आपल्या फिरकी गोलंदाजीच्या तालावर नाचवले.

यंदाच्या स्पर्धेत भरात असलेला अनुभवी फलंदाज डेव्हिड वीसेने एकाकी लढत देताना 26 धावांची खेळी केली. तळात जेन फ्रेलिंकने नाबाद 15 तर, रुबेन ट्रम्पलमनने नाबाद 13 धावा केल्या त्यामुळे त्यांना शतकी धावसंख्या उभारता आली. नामिबियाने 20 षटकात 8 बाद 132 धावा केल्या. भारताकडून जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी 3 तर, बुमराहने 2 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक – नामिबिया – 20 षटकांत 8 बाद 132 धावा. (डेव्हिड वीसे 26, स्टीफन बार्ड 21, मायकेल व्हॅन लिंजेन 14, जेन फ्रेलिंक नाबाद 15, रुबेन ट्रम्पलमन नाबाद 13, रवींद्र जडेजा 3-16, रवीचंद्रन अश्‍विन 3-20, जसप्रीत बुमराह 2-19).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.