मुंबई: देशातील अर्थव्यवस्था चांगली असल्यामुळे आणि जागतिक बाजारातील भांडवल सुलभतेमुळे चार दिवसापासून शेअरबाजार निर्देशांक वाढत होते. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स मंगळवारी विक्रमी पातळीवर बंद झाला होता. मात्र निवडणुका आणि कमी पर्जन्यमानाच्या शक्यतेमुळे बुधवारी शेअरबाजारात नफेखोरी होऊन निर्देशांक कमी झाले.
जागतिक शेअरबाजारात बुधवारी तेजीचे वातावरण होते. मात्र भारतीय शेअरबाजाराचे निर्देशांक कमी झाले. बुधवारी तेल आणि नैसर्गिक वायू, दूरसंचार, धातू आणि आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. आज शेअरबाजारात वातावरण कमालीचे अस्थिर होते. त्यामुळे निर्देशांक 450 अंकांनी कमी-जास्त झाले.
बाजार बंद होताना बुधवारी सेन्सेक्स 179 अंकांनी कमी होऊन 38,877 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 69 अंकांनी कमी होऊन 11,643 अंकांवर बंद झाला.
याबाबत सॅक्टम मालमत्ता व्यवस्थापन संस्थेचे मुख्य गुंतवणूक अधिकारी सुनील शर्मा म्हणाले की, सकाळी निर्देशांक वाढले होते. मात्र पाऊस कमी पडणार असल्याचे भाकित काही संस्थांनी दुपारी वर्तवल्यानंतर निर्देशांक कमी झाले. सकारात्मक पतधोरण जाहीर करण्याची शक्यता असतानाही गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. बुधवारी तेल आणि नैसर्गिक वायू, दूरसंचार, भांडवली वस्तू, ऊर्जा, आरोग्य क्षेत्रातचे निर्देशांक 2.06 टक्क्यापर्यंत कमी झाले. त्याबरोबर स्मॉल कॅप व मिडकॅप 0.80 टक्क्यांपर्यंत कमी झाले. असे असले तरी मंगळवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 543 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर देशातील संस्थापक गुंतवणूकदारांनी 437 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.