मुंबई – पहिल्या तिमाहीत विकासदर 23.9 टक्क्यांनी कोसळला असला तरी हा विकासदर लवकरच वाढेल असे देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांना वाटत आहे.
त्यामुळे खरेदी वाढून शेअर बाजार निर्देशाकांची आगेकूच चालू आहे. बुधवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 185 अंकांनी म्हणजे 0.48 टक्क्यांनी वाढून 39,086 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 64 अंकांनी वाढून 11,535 अंकांवर बंद झाला.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतामध्ये गुंतवणूक करीत आहेत. काल या गुंतवणूकदारांनी 486 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. आज जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आल्यामुळे शेअरबाजारातील वातावरण उत्साहवर्धक होते. वाहन कंपन्यांची विक्री ऑगस्ट महिन्यात वाढली आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअरची आज बरीच खरेदी झाली त्याचबरोबर रिलायन्स कंपनी तेजीत आहे.