नागपूर : “करोना’ विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागपूर जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, सोशल मीडियावरील अफवांमुळे भीतीच्या वातावरणात वाढ होत आहे.
त्यावर नियंत्रणासाठी नागपूरमध्ये स्वतंत्र वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. करोनाबाबत जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी त्यांच्या कक्षात या वेबपोर्टलचे लोकार्पण केले. करोनामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
त्यात अफवांमुळे नागरिकांमध्ये वाढत असलेली दहशत रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने जनजागृतीचे सर्व उपाय केले.
याअंतर्गत शहरातील सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी तयार केलेल्या www.fightagainstcorona.social या वेबपोर्टलचं लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.
अजित पारसे यांनी तयार केलेले वेबपोर्टल नागरिकांना उपाययोजनासंदर्भात नक्कीच फायद्याचे ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
या वेबपोर्टलवर मराठी आणि इंग्रजीतून कोरोनाबाबत माहिती देण्यात आली आहे. कोरोनाची लागण कुणाला होऊ शकते, कशाप्रकारे होऊ शकते, लक्षणे आदीची माहिती या पोर्टलवर देण्यात आली आहे.