‘हिंजवडी, माण, मारुंजीसाठी स्वतंत्र नगरपालिका विचाराधीन’

मारुंजी येथे आमदार संग्राम थोपटे यांचे सूतोवाच

हिंजवडी – मुळशी तालुक्‍यातील हिंजवडी, माण, मारुंजी सारख्या वेगाने विस्तरणाऱ्या गावांचा महापालिकेत समावेश करण्यास होणारा विरोध पाहता येथील जनभावना लक्षात घेऊन या पाच-सहा गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका अथवा नगरपरिषद करण्याकरिता या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आवश्‍यक तो पाठपुरावा करणार असल्याचे सूतोवाच आमदार संग्राम थोपटे यांनी मारुंजी येथे बोलताना केले.

मारुंजी येथे तालुक्‍यातील नवनिर्वाचित सदस्याच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. मारुंजी गावच्या सरपंचपदी कृष्णा बुचडे तर उपसरपंच पदी देविदास बुचडे यांची निवड झाल्याबद्दल भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले होते. या वेळी मुळशी तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा देखील सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याचे आयोजन शिवाजीराव बुचडे पाटील युवा मंच व मारुंजी ग्रामस्थाच्या वतीने केले होते.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, सहकार महर्षी माऊली दाभाडे, नगरसेवक सचिन दोडके, जिल्हा परिषद सदस्य व गटनेते विठ्ठल आवाळे, मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, युवा नेते सुरेश हुलावळे, किशोर धनकवडे, काका पवार, संजय उभे, दगडू करंजावणे, नंदकुमार भोईर, ज्ञानेश नवले, बाळासाहेब विनोदे, शिवाजीराव जांभूळकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम माडेकर, पांडुरंग राक्षे, संतोष साखरे, मल्हारी साखरे, बाळासाहेब भिंताडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मारुंजी ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवत सत्ता स्थापन केल्याबद्दल श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पैनलचे प्रमुख, मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव बुचडे पाटील व हिंजवडीचे माजी सरपंच शामराव हुलावळे यांची वारकरी महामंडळाच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद गटातील 20 गावांच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांना आमदारांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ते पुढे म्हणाले, ताथवडे येथील गायरानात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रूपाने मुळशी तालुक्‍याला एक मोठी बाजारपेठ मिळणार आहे. मारुंजीचे नवनिर्वाचित सरपंच कृष्णा बुचडे यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.