पुणे -लष्कर परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात लहान मुले आणि मातांसाठी स्वतंत्र इमारतीत कोविड उपचार सुविधा उभारण्याचे प्रयत्न कॅन्टोन्मेंट बोर्ड करत आहे. त्यासाठी संरक्षण मालमत्ता विभागाने 5.43 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी बोर्डाने केली आहे.
करोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर पटेल रुग्णालयात लहान मुले आणि मातांवर करोना उपचारांसाठी स्वतंत्र इमारत उभारणे. तेथे सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी दिली.
यावेळी कुमार म्हणाले, “पूनावाला ट्रस्टच्या सहकार्याने बोर्डाने ही स्वतंत्र इमारत उभारली आहे. येथे माता-मुलांसाठी कोविड उपचार केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी 86 खाटांची व्यवस्था केली जाणार असून, त्यामध्ये 10 पेडिऍट्रिक आयसीयू, 6 हाय डिपेन्डेसी युनिट आणि पाच एनआयसीयू खाटांचा समावेश असेल.
यासाठी एकूण 5.43 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. पीएम केअर अथवा अन्य स्रोतांद्वारे बोर्डाला हा निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव संरक्षण मालमत्ता विभागाकडे पाठवला आहे. त्याला तातडीने मान्यता मिळणे आवश्यक आहे.’