- एक कोटीचा खर्च
- स्थायी समितीची ऐनवेळी मंजुरी
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये डॉक्टर, परिचारिका यांनी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता देण्याची मागणी वैद्यकीय विभागाकडून करण्यात आली होती. त्यानुसार, वायसीएम रुग्णालयासह महापालिकेच्या इतर रुग्णालये व दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या मानधनावरील वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, पॅरामेडिकल स्टाफ, प्रयोगशाळा चिकित्सक यांना कोविड भत्ता देण्यास स्थायी समितीने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यानंतर, महापालिका आस्थापनेवरील वैद्यकीय तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील स्वतंत्र कोविड भत्ता देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेची या आठवड्याची स्थायी समितीची बैठक आज ऑनलाइन पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी ऍड. नितीन लांडगे होते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मार्च 2020 मध्ये करोनाचे पहिले रुग्ण आढळले. त्यानंतर सातत्याने महापालिकेच्या रुग्णालये व दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स व पॅरामेडिकल कर्मचारी कोविडचे काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र कोविड भत्ता अदा करण्यात यावा याबाबत वैद्यकीय विभागाने 19 मे रोजी प्रस्ताव सादर केला होता. त्याला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.
त्यानंतर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह महापालिकेच्या इतर रुग्णालये व दवाखान्यातील वैद्यकीय तांत्रित संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही स्वतंत्र कोविड भत्ता देण्यात येणार आहे. वर्ग 1 व 2 यांना 15 हजार रुपये, वर्ग 3 साठी 10 हजार रुपये व वर्ग 4 साठी 5 हजार रुपये स्वतंत्र कोविड भत्ता देण्यात येणार आहे. यामध्ये महापालिका आस्थापनावरील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश आहे.
वर्ग 1 मध्ये 84, वर्ग 2 मध्ये 7, वर्ग 2 मध्ये 88, वर्ग 3 मध्ये 587 व वर्ग 4 मध्ये 397 कर्मचारी आहेत. वर्ग 1 ते 4 असे मिळून 1156 अधिकारी व कर्मचारी आहेत. 1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 या कालावधीतील हा स्वंर्तत्र कोविड भत्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 2 लाख 35 हजार रुपये खर्च येणार आहे.
यांनाही मिळणार कोविड भत्ता
यासोबतच प्रजनन व बाल आरोग्य, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम अंतर्गत मानधनावर कार्यरत असलेले शहर कार्यक्रम व्यवस्थापक, शहर लेखा व्यवस्थापक, लेखापालस लिपीक, ए.एन.एम, डेटाएन्ट्री ऑपरेटर, लेखापाल स्टाफनर्स, वरिष्ठ डॉटस प्लस व क्षयरोग एचआयव्ही पर्यवेक्षक, वरिष्ट क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, टीबी हेल्थ व्हिजीटर, पीपीएम कॉर्डिनेटर, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तज्ज्ञ, बालवाडी शिक्षिका व आशा स्वंयेसविका यांना 10 हजार रुपये कोविड भत्ता देण्यात येणार आहे. तसेच मदतनीस व ड्रायव्हर यांना 5 हजार रुपये स्वतंत्र कोविड भत्ता देण्यास उपसुचनेद्वारे मंजुरी देण्यात आली आहे.