कल्याण: राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यावर रोख मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कल्याण-डोंबिवली महापालिकाहद्दीत स्वतंत्र करोना लॅब उभारण्यात येत आहे. या लॅबसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंजुरी दिली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत अधिकाधिक संख्येने करोना रुग्णांची तपासणी व्हावी, यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
कल्याण-डोंबिवलीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून इथे स्थानिक पातळीवर लॅब असणे आवश्यक आहे. सध्या संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी मुंबई येथील केईएम रुग्णालय आणि जेजे रुग्णालयात पाठवावे लागत होते. त्यामुळे अहवाल येण्यास वेळ लागत होता आणि उपचारांमध्ये अडचणी येत होत्या. यासाठीच कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना तपासणीची स्वतंत्र लॅब असावी, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती.