कचरा संकलन गाड्यांवर पिवळ्या रंगाच्या “रेड डॉट’ असलेल्या पेट्या
पुणे – कचरा संकलनावेळी सॅनिटरी नॅपकिन स्वतंत्र गोळा करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने कचरा वाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोंना पिवळ्या रंगाच्या “रेड डॉट’ असलेल्या पेट्या बसविल्या आहेत. नागरिकांनी विशेषत: महिलांनी सॅनिटरी नॅपकिन या पेट्यांमध्ये टाकावेत, असे आवाहन घनकचरा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
घरगुती कचऱ्यासोबत येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनवर प्रक्रिया करता येत नाही. यासाठी महापालिकेने सॅनिटरी नॅपकिन आणि मेडिकल वेस्टचा कचरा जाळून नष्ट करण्यासाठी इन्सिनेटर बसविले आहेत; परंतु अन्य कचऱ्यासोबतच सॅनिटरी नॅपकिन येत असल्याने कचरावेचक आणि कचरा रॅम्पवर विलगीकरणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे नॅपकिन हाताने बाजूला काढावे लागतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. यासाठी महापालिकेने कचरा गोळा करणाऱ्या टेम्पोलाच स्वतंत्ररित्या पिवळ्या रंगाच्या आणि त्यावर “रेड डॉट’ असलेल्या पेट्या बसविल्या आहेत. महिलांनी घरातील कचरा देताना सॅनिटरी नॅपकिन या पिवळ्या पेटीत टाकल्यास विलगीकरणाची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सुटसुटीत होणार आहे.