पिंपरी, (प्रतिनिधी) – भोसरी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी मंगळवारी (दि. २९) निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रभारी अशोक वाळके, शहर समन्वयक कैलास नेवासकर, उपशहरप्रमुख नेताजी काशीद, माजी विरोधी पक्षनेता महादेव गव्हाणे, दिलीप सावंत व कार्यकर्ते उपस्थित होते.
रवि लांडगे यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मात्र, भोसरी मतदार संघ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला गेल्याने अजित गव्हाणे यांना येथून उमेदवारी मिळाली. त्यामुळे रवि लांडगे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून ते आपला अर्ज मागे घेतात, की बंडखोरी करतात. हे सोमवारी (दि. ४) स्पष्ट होईल.
रवि लांडगे म्हणाले, “गेल्या दहा वर्षात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा बकालपणा वाढला आहे. या मतदारसंघात दहा वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शेकडो कोटींच्या खर्चाची कामे झाली आहेत.
या कामांमुळे भोसरी मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीत पुढारलेला असायला हवा होता. मात्र भोसरीतील जनतेला आजही मुलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याचे वास्तव आहे. असा रवि लांडगे यांचा आरोप आहे.