इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये 76 वा स्वातंत्र्यदिन राजकीय पक्षांच्या भूमिकेमुळे “काळा दिन’ ठरला. देसातील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि विरोधकांनी सरकारबद्दल असंतोष दाखवण्यासाठी स्वातंत्र्यदिन “काळा दिन’ पाळला. देशाच्या विविध भागांमध्ये सरकारविरोधी वेगवेगळी आंदोलने सुरू असल्याचा परिणाम स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पहायला मिळाला.
उत्तर आणि दक्षिण वझिरीस्तानमधील नागरीक तालिबान आणि इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी कारवायांमुळे हैराण झाले आहेत. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ प7ाचे नेते आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहोरधील हॉकी स्टेडियममध्ये विराट सभा घेऊन सरकारवर हल्लाबोल केला. इम्रान खान यांच्या आवाहनानुसार “पीटीआय’च्या कार्यकर्त्यांनी कराची, इस्लामाबाद आणि रावळपिंडी शहरांमध्ये मोठमोठे बॅनर लावले होते.
दुसरीकडे ‘तेहरीक ए लबाईक पाकिस्तान’ने रावळपिंडीत लियाकत बागेपासून फिरोझाबाद दरम्यान सरकारच्या निषेधाचा “नजरिया पाकिस्तान’नावाचा मोर्चा काढला होता. या मोर्च्यासाठी फिरोझाबाद ते मुर्मी रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे लाहोर आणि रावळपिंडी या शहरांमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सरकार जनतेला मूर्ख बनवत असल्याची टीका “टीएलपी’चे नेते साद हुसैन रिझवी यांनी केली.
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम काही राजकीय पक्षांनी आयोजित करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक काश्मिरी नेत्यांनी हा कार्यक्रम हाणून पाडला.