Independence Day 2024: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार,15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर सलग 11 व्यांदा तिरंगा फडकवणार आहेत. यानंतर ते देशाला संबोधित करणार आहेत. यानंतर लाल किल्ल्यावरून सलग 11 वेळा भाषण देणारे ते देशाचे तिसरे पंतप्रधान बनतील. यापूर्वी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी हा पराक्रम गाजवला होता. 9 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेऊन नरेंद्र मोदी यांनी नेहरूंच्या तीन टर्मच्या विक्रमाची बरोबरी केली होती. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7.33 वाजता पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत. याआधी सकाळी 7.30 वाजता पंतप्रधान मोदी ध्वजारोहण करतील.
भारतात दरवर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. पीएम मोदी तिसऱ्या इनिंगच्या सुरुवातीला सरकारचे प्राधान्यक्रम देशासमोर मांडू शकतात. भारताला विकसित देश बनवण्याच्या रोड मॅपबद्दलही ते सांगू शकतात.
2024 च्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे?
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. गुरुवार, 15 ऑगस्ट रोजी 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. यंदाची थीम ‘विकसित भारत’ अशी ठेवण्यात आली आहे. हे सन 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात रुपांतरित करण्याच्या सरकारच्या संकल्पनेशी सुसंगत आहे. 2047 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होईपर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. दिल्लीतील या कार्यक्रमासाठी पीएम मोदींव्यतिरिक्त सर्व केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर अनेक लोकांना आमंत्रित केले आहे.
सर्वाधिक प्रदीर्घ भाषण देण्याचा विक्रमही नोंदवला –
स्वातंत्र्यदिनी सर्वात लांब भाषण देण्याचा विक्रमही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आहे. त्यांच्या भाषणाचा सरासरी कालावधी 82 मिनिटांचा आहे. भारताच्या इतिहासातील इतर कोणत्याही पंतप्रधानांपेक्षा हे जास्त आहे. माजी पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल 71 मिनिटांच्या सरासरीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. हा आकडा त्यांनी 1997 मध्ये दिलेल्या एकमेव भाषणावर आधारित आहे.
मोदींच्या भाषणांचा कालावधी वेगवेगळा आहे. 2017 मधील त्यांचे सर्वात लहान भाषण 55 मिनिटांचे होते. तर 2016 मध्ये त्यांचे सर्वात मोठे भाषण 94 मिनिटांचे होते. 1947 मध्ये नेहरूंचे पहिले भाषण केवळ 24 मिनिटांचे होते. मोदींच्या आधी इंदिरा गांधी यांच्या नावावर सर्वाधिक प्रदीर्घ भाषण करण्याचा विक्रम होता. 1972 मध्ये त्यांनी 54 मिनिटांचे भाषण केले होते.