वाघोली – पुणे जिल्हा खान क्रशर उद्योग संघाच्या वतीने 1 सप्टेंबर रोजी वाघोली ते लोणावळा पर्यंतच्या सर्व भागातील खाण क्रशर उद्योगातील साहित्याची दरवाढ करण्यात आली होती. मालाचा दर्जा व गुणवत्ता राखण्यासाठी जिल्हाभरात एकच भाव यासाठी निर्णय घेण्यात आला होता.
मात्र मालाची खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने पुणे जिल्हा खाण क्रशर उद्योग संघाच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला असल्याची माहिती संघाचे कार्याध्यक्ष रामभाऊ दाभाडे यांनी दिली.
याबाबत रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले की वाहतुकीचा खर्च, उद्योगासाठी लागणारी वीज आणि त्या विजेचे वाढलेले दर, खाण क्रशर उद्योगासाठी लागणारे स्पेअर पार्ट यांचे वाढलेले दर लक्षात घेऊन जिल्ह्यातील खाण क्रशर मालकांनी एकत्र येऊन दर निश्चित करून देखील दरवाढ बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राह्य धरली जात नसल्याने व योग्य प्रतिसाद मिळत नसल्या कारणाने जिल्ह्यात बेमुदत संप पुकारण्यात आला असल्याचे दाभाडे यांनी सांगितले.
या सभेसाठी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विलास लांडे, कार्याध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद, उपाध्यक्ष रामदास काकडे, सचिव नगरसेवक योगेश ससाणे, खाण क्रशर मालक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.