पळसदेव, (वार्ताहर) – राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने यावेळेसची निवडणूक नेमकी कोणाला अवघड व कोणाला सुखकर होणार याची तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
त्यातच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेशाच्या बातम्या येऊ लागल्याने नेमकं पाटील काय निर्णय घेणार आणि त्याचा तालुक्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार याची उत्सकता संपूर्ण तालुक्याला लागून राहिली आहे. पाटील यांच्या निर्णयावरून अनेक राजकीय गणित बनणार व बिघडणार आहे.
पाटील नेमका काय निर्णय घेणार, याची खबर अगदी त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना देखील नसल्याने ते देखील अद्याप भाऊंच्या निर्णयाबाबत वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. भाऊ आमचं मत घेत आहेत; मात्र काय निर्णय घेतील हे मात्र येणारी वेळच ठरवेल असं सांगत आहेत.
हर्षवर्धन पाटील यांनी राज्याच्या राजकारणात 1995ची विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती. त्यानंतर सलग दोन टर्म 1999 व 2004 या निवडणुका अपक्ष उमेदवार म्हणूनच लढवल्या होत्या.
तर 2009ची निवडणूक काँग्रेस पक्षात प्रवेश करून लढून जिंकली. सन 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून लढून पाटील यांना दत्तात्रय भरणे यांच्याकडून 14 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.
मात्र 2019 च्या निवडणुकीत पाटील यांनी भाजपच्या लाटेवर स्वार होण्याचा विचार करून 2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढली; मात्र पुन्हा त्यांना 3 हजार मतांनी निसटता प्रभाव स्वीकारावा लागला.
संधी पाहून पक्षप्रवेश करूनही पाटील यांना अपेक्षित यश मिळाले नाही. सध्या मात्र लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.
पक्ष फोडीमुळे ठाकरे व शरद पवार गटाला जनतेची सहानभूती मिळाली. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचा चांगलाच पाडाव झाला.
याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पुन्हा पाटील पक्ष बदलण्याच्या मानसिकतेत आहेत काय, असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे. शरद पवार यांच्या भेटीने पाटील यांच्या तुतारी प्रवेशाच्या चर्चाना उधाण आलं आहे.
सध्या पक्षबदल पाटील यांना परवडणारा नाही. राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्षपद, शिवाय कारखान्याला कोट्यवधी रुपयाचे कर्ज, या बाबी भाजप प्रवेशाने शक्य झाल्या आहेत; मात्र कमळावर लढणं आणि जिंकणं हे देखील तितकसं सहज नाही.
भाजपबाबत जनतेच्या मनात वाढता रोष यामुळे तालुक्यात कमळ चिन्हावर देखील इंदापूरच्या गड सुखकारक नाही. लाडक्या बहीण योजनेमुळे लोकांच्या मानसिकतेत फारसा बदल झाला नाही.
सध्या राज्यात भाजप व राष्ट्रवादी युतीचे सरकार आहे. निवडणूक युतीने एकत्र लढली तर इंदापूची जागा कोणाला जाणार कोणाचे पुनर्वसन होईल.
कोणाची विधान परिषदेवर वर्णी लागेल याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तालुक्यात तुतारीबाबत सहानुभूती
अद्याप तालुक्यात तुतारीबाबत सहानुभूती असल्यामुळे तुतारी पाटलांना सुखकारक होऊ शकते, असे मत अनेक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
पाटील यांच्या तुतारी प्रवेशाने मात्र भरणे यांचा मार्ग सुखकारक होऊ शकतो व तालुक्यात तिरंगी लढत झाल्यास यांचा अधिकचा फायदा विद्यमान आमदार भरणे यांचा होईल, असे मत भाऊ, मामाचे अनेक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.