माजी खासदार आढळराव पाटील यांची माहिती
पुणे – निवडणुकीमुळे कोणीही कोणत्या पक्षात प्रवेश करतो आहे. सध्या, सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. इंदापुरमधील एक वजनदार नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र, ती जागा शिवसेनेला जाणार आहे, असे शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवारजीराव यांनी सांगितले.
भोसरी येथील पत्रकार परिषदेत आढळराव बोलत होते. या वेळी झालेल्या बैठकीत आगामी विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभुमीवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपजिल्हा प्रमुख नीलेश मुटके, माजी गटनेत्या सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, उपशहर प्रमुख नेताजी काशिद, उपशहर प्रमुख आबा लांडगे आदी उपस्थित होते.
आढळराव पाटील यांनी सांगितले की, भोसरी विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार संघ आहे. त्यामुळे या मतदार संघावर शिवसेनेचा दावा कायम आहे. विधानसभेला भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर आमदार महेश लांडगे यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवावी. भोसरीमध्येही शिवसेनेची ताकद आहे. आमदार महेश लांडगे यांना माझा विरोध नाही. मात्र, त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवावी.
दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी इंदापुरच्या जागेबाबत माहिती जाहीर केल्याने इंदापुरातील वजनदार नेते म्हणजेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना नेमकी कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळणार, याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. परंतु, युतीच्या जागा वाटपात इंदापुरची जागा ही परंपरेनुसार शिवसेनेकडे आहे. गेल्या पंचवार्षिकलाही ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली होती. इंदापुरातून शिवसेनेकडून विशाल बोंद्रे रिंगणात उतरले होते. त्यांनी तिसऱ्या क्रमांची मते पडली असली तरी मराठा समाजावर त्यांनी चांगली छाप सोडली होती.
यावेळची राजकीय परिस्थिती पाहता इंदापुरातून शिवसेनेचाही उमेदवार निवडून येऊ शकतो, याच कारणातून यावेळी युतीच्या जागावाटपात इंदापुरची जागा शिवसेनेकडेच राहणार आहे. या जागेवर आताच शिवसेने दावा केला आहे. त्यामुळे माजी सहकारमंत्री पाटील हे भाजप मध्ये प्रवेश करीत असले तरी त्यांना युतीच्या धर्मानुसार शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करावे लागेल, त्यांना इंदापुरातून उमेदवारी हवी असल्यास पाटील यांना भाजपमध्ये नव्हे तर शिवसेनेत प्रवेश करावा लागणार असल्याचीही चर्चा आहे.