इंदापूर – राज्यामध्ये इंदापूर विधानसभेचा मतदारसंघ यामध्ये खर्या अर्थाने शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये लढत होणार असे बोलले जात होते; मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातील जुने मोठे मातब्बर यांनाची नाराजी दूर करण्यात यश आले नाही.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आप्पासाहेब जगदाळे यांनी थेट हाती घड्याळ बांधणार असल्याची घोषणा केली. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणुकीच्या रिंगणात ठेवण्याची भूमिका प्रवीण माने यांनी घेतल्याने शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांनी जोरदार विधानसभेची तयारी करत, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते, आप्पासाहेब जगदाळे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत आपलेसे करण्यात यश मिळवले आहे.
प्रवीण माने हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना ग्रामदैवत बाबिर याचे पावित्र्य असलेला गुलाल हजारोंच्या समोर उचलून आता माघार नाही हा पवित्रा घेतला. त्याच शब्दाला जागे राहत, मतदान प्रचारात आघाडी घेत, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्या मार्गदर्शनाखाली अपक्ष म्हणून, जनसामान्य जनतेचा पाठिंबा मिळवत, मोठे आवाहन थेट आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासमोर उभे केले आहे.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊन मोठा चमत्कार करतील अशी चर्चा होती; मात्र आपल्याच पक्षातील ज्या जुन्या सहकार्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना मताचे अधिक दान दिले. ते शिलेदार इंदापूर विधानसभा निवडणुकीत आपल्या विचाराबरोबर घेण्यामध्ये प्रचंड कमी पडले आहेत. प्रवीण माने आप्पासाहेब जगदाळे व भरत शहा हे तीनच मोठे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेली दिसत नाहीत. यातील अप्पासाहेब जगदाळे व प्रवीण माने यांनी वेगळी वाट धरली तर भरत शहा यांचे पूर्णपणे मनोमिलन अद्यापि झालेले नाही. तसे पाहिले तर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या सोबतीला त्यांचे सर्व अखंड कार्यकर्ते प्रचार यंत्रणेत मनोमन काम करताना दिसतायेत. आप्पासाहेब जगदाळे यांनी थेट अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्याने, आमदार दत्तात्रय भरणे यांचे पारडे जड झाले आहे.
चिन्ह मिळाले मात्र मतदार कुठे ?
इंदापूर विधानसभेची निवडणूक शरद पवारांनी हाती घेतल्याचे चित्र निर्माण करण्यात येत आहे. मात्र हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाची उमेदवारी मिळाली, चिन्ह मिळाले या बरोबरीला या पक्षाचे जुने मतदार हवे होते. तसे घडताना दिसत नाही त्यामुळे या पक्षाचे जुने मतदार कुठे? असा सवाल केला जात आहे.
शेवटच्या दिवशी दहा उमेदवारांची माघार –
इंदापूर विधानसभेसाठी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी दहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये भाऊराव झेंडे, सविता कडाळे, अंकिता पाटील, कल्याणी वाघमोडे, हर्षवर्धन श्रीपती पाटील, बाळासो धापते, अॅड. राहुल बंडगर, निशिकांत तोरणे, शिवाजी आरडे, सगाजी कांबळे, या दहा उमेदवारांचा समावेश आहे.