इंदापूर तहसीलदारांवर राजकीय दबावापोटी कारवाई नाही

माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांचा सनसनाटी आरोप : गौणखनिजची कागदपत्रं जाळली

रेडा – इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी इंदापूरचा कार्यभार स्वीकारल्यापासून गौणखनिज संपत्तीची व बेकायदेशीर कृत्याची मालिकाच सुरु झाली आहे. त्या विदर्भातून आर्थिक तडजोड करून इंदापुरला आल्या आहेत. लाखो रुपये राज्यकर्त्यांना देवून बदली करून आल्यामुळे त्यांच्यावरील आरोपाची चौकशीही होत नाही, असा सणसनाटी आरोप माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी केला.

याबाबत मखरे यांनी मंगळवार (दि.18) महसूल, वन विभाग मंत्रालय सचिव, विभागीय आयुक्‍त पुणे, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. सुयोग जगताप, उपजिल्हाधिकारी बारामती विभाग, तहसीलदार इंदापूर, आमदार दत्तात्रय भरणे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, मंत्री राम शिंदे यांना निवेदन पाठवले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गौणखनिज संपत्तीच्या संदर्भातील माहितीच्या आधिकरात मागितलेल्या फाईलींच्या नकला गेल्या कित्येक महिन्यांपासून मला मिळालेल्या नाहीत. कारकुन मोहिते यास वारंवार भेटून तसेच तत्कालीन नायब तहसिलदार ओहोळ यांना भेटून माहितीच्या अधिकारात मागितलेल्या नकला देण्याविषयी विनंती केली. त्या दोघांनी सांगितले की, तहसीलदार यांनी नकला देऊ नका, त्याला काय करायचे ते करू द्या. मी खंबीर आहे. तो माझ्याविरोधात तक्रारी करतो, असेही दोघांनी सांगितले. गौणखनिज संपत्तीच्या फाईली सोनाली मेटकरी यांनी जाळून नष्ट केल्या आहेत. याबाबतचे मी लेखी पुरावे देऊनही कार्यालयाने काहीही कारवाई केली नाही. आतापर्यंत मेटकरी या जेलमध्ये असायल्या हव्या होत्या. त्या बाहेरच कशा काय आहेत. हे काय समजून येत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला. त्यांचे पती व ते दोघेजण दारु पिऊन लोकांना मारहाण करतात. गुंडगिरी व दादागिरी करतात. त्यांच्या पाठीशी राजकीय हात असल्यामुळे गोरगरीब माणसे त्यांना भितात. त्यांच्याविरोधामध्ये मी पुराव्यानिशी तक्रारी दिल्या आहेत. पण त्याची दखल अद्यापपर्यंत घेतली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

आमदार भरणेंचा तहसीलदारांवर वरदहस्त
जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. सुयोग जगताप, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडील जा.क्र. खनिकर्म/कावि/1072/ 2019 दि. 17/5/2019 चे उपविभागीय अधिकारी, इंदापूर-बारामती उपविभाग, बारामती यांना पाठविलेल्या पत्राची एक प्रत प्राप्त झालेली आहे. प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. त्यांनी दाद दिली नाही. त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात जाण्याशिवाय मला पर्याय नाही, असा इशारा मखरे यांनी दिला. तहसीलदार मेटकरी यांना आमदार दत्तात्रय भरणे, महादेव जानकर, राम शिंदे यांच्या आशीर्वाद आहे. तसेच दबाब असल्याचा आरोप त्यांनी केला.

मखरे यांच्या तक्रारीबाबत आमचे वरिष्ठ या प्रकरणाची वस्तुस्थिती तपासतील. त्यानंतर त्यांनी तक्रारदार यांचीही पार्श्‍वभूमी तपासावी. व निर्णय घ्यावा. मला आमचे वरिष्ठ जे निर्णय घेतील, तो मान्य असेल.
– सोनाली मेटकरी, तहसीलदार, इंदापूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)