इंदापूर तालुका मंगळवारपासून अनलॉक; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

सकाळी 7 ते 11 याच वेळेतच दुकाने सुरू राहणार

रेडा -इंदापूर तालुक्‍यात एका आठवड्याचे लॉकडाऊन लावले होते. त्यानंतर करोनाची आकडेवारी कमी होत आहे. नागरिकांनी लॉकडाऊनला चांगले सहकार्य केले आहे. 

इंदापूर तालुक्‍यात मंगळवार (दि.18) पासून शासकीय नियम पाळून अनलॉक करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंदापूर शहरात भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, प्रतापराव पाटील, अतुल झगडे, हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर उपस्थित होते. भरणे म्हणाले

की, इंदापूर तालुक्‍यात प्रत्येक ठिकाणी रूग्णांवर उपचारासाठी आपली मोठी तयारी झाली आहे. मात्र तिसरी लाट भयंकर असल्याचे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लहान बालकांची काळजी घ्यावी.

नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जपले पाहिजे. कोणत्याही आईला आपल्या लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये पाहणे आवडणार नाही. त्यामुळे सर्वांनी कुटुंबाची काळजी घ्यावी.

कोविड नियंत्रक प्रशांत महाजन म्हणाले की, तालुक्‍यात 1 ते 15 वर्षे वयोगटातील लहान मुलांची संख्या 1 लाख 3 हजार असून त्यांना लसीकरण करण्याबाबत आरोग्य प्रशासन विचार करीत आहे.

यावेळी तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, जीवन माने, अधिकारी उपस्थित होते.

नियम मोडणाऱ्यांकडे लक्ष द्यावे
बारामती तालुक्‍यात ज्याप्रमाणे पोलीस प्रशासनाने नियोजन करून कडक लॉकडाऊन ठेवले आहे, त्याचप्रमाणे इंदापूर शहरात कडक लॉकडाऊन होताना दिसले नाही. आता मंगळवारपासून अनलॉक करीत आहोत.

मात्र, पोलिसांनी यामध्ये अलर्ट राहायचे असून, नागरिकांची गर्दी अजिबात होवू द्यायची नाही, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी. असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पोलिसांचे कान टोचले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.