भवानीनगर – तावशी (ता. इंदापूर) येथे झालेल्या जिलेटीनच्या स्फोटामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सचिन महादेव चव्हाण यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. राहुल मारुती सेंडगे (वय 21, मूळ रा. चौदापूर, जि. कलबुर्गी, कर्नाटक, सध्या रा. तावशी), असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवार (दि. 16) सकाळी साडेअकराच्या सुमारास तावशी येथील हद्दीत शेतजमीन गट नं.180 मधील विहिरीत काम सुरू होते. त्यावेळी जिलेटिनचा स्फोट झाला. यात राहूल सेंडगे यांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे, पोलीस हवालदार गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
सहायक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे करीत आहेत.