राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांची आघाडी झाल्याने इंदापूर तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी अवघड जागेचे दुखणे निर्माण झाले आहे. कॉंग्रेसचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील तसेच राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेची उमेदवारी हवी आहे.
उमेदवारी, मात्र एकच द्यावयाची असतानाही दोन इच्छुक आहेत. राज्यात भाजप व शिवसेनामध्ये राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधील विद्यमान आमदारांची पक्ष प्रवेशाची भरती सुरू असताना देखील इंदापूर तालुक्यात वेगळे चित्र आहे. आमदार भरणे व माजी मंत्री पाटील हे विधानसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांकडे आग्रही आहेत. त्यामुळे आजी व माजी आमदारांचे भवितव्य शरद पवारांच्या हाती आहे.
लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य देण्यासाठी मदत केली. कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास पाटील यांनी भाग पाडले. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी मंत्री पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन मदतीसाठी विनंती केली होती. पाटील यांना साथ देण्याचे धोरण ठरल्याचे बोलले जात आहे. याच उर्जेवर आजही पाटील भाजपमध्ये प्रवेश न करता राष्ट्रवादीची मला साथ हवी आहे, असे खुलेआम सांगत आहेत. दुसरीकडे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा बातम्यांचे पेव फुटले असताना केवळ राष्ट्रवादीच्या साथीने मला आमदार होता येईल, अशी खात्री पाटलांना आहे.
आमदार भरणे यांनी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी 900 कोटींवर निधी खेचून आणला आहे. शिवस्वराज्य यात्रेतील इंदापूर येथील सभेत आमदार भरणे यांनी उमेदवारीबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे. तो घ्या असे बोलून मवाळ भाषणातून राष्ट्रवादीला अनोखा संदेश दिला आहे. दरम्यान, इंदापूर विधानसभेची चावी मात्र खुद्द शरद पवारांकडे आहे, हे नाकारता येणार नाही.