-->

मंत्रिपदाच्या शर्यतीत इंदापूर आघाडीवर

आमदार भरणे समर्थकांमध्ये आशेचा किरण

नीलकंठ मोहिते

रेडा – माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा तब्बल दोन वेळा इंदापूर विधानसभेमध्ये पराभव करुन आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर विधानसभेत दुसऱ्यांदा बाजी मारत प्रतिनिधी होण्याचा मान मिळवला आहे. तालुक्‍यातील उपेक्षित 22 गावांचा व शेतीच्या पाणी प्रश्‍नाने भाजपने आमदार भरणे यांच्यावर टीका करून हैराण केले होते. परंतु पाणी प्रश्‍न मीच मार्गी लावणार अशी ग्वाही आमदार भरणे यांनी दिली होती. आगामी काळात इंदापूर तालुक्‍यात भाजपला कायमचे रोखण्यासाठी आमदार भरणे यांना मंत्रीपद देण्याच्या हालचाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरू झालेल्या दिसू लागल्या आहेत.

आमदार दत्तात्रय भरणे हे धनगर समाजाचे एकमेव नेते राज्यातून विधानसभेत निवडून गेलेले आहेत. केवळ आपल्या केलेल्या विकासकामांच्या जोरावर आमदार भरणे विधानसभेत पोहचले आहेत. त्यामुळे आमदार भरणे यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावेच लागणार हे निश्‍चित झाले आहे.

इंदापूर तालुक्‍यामध्ये शेतीच्या पाण्यावाचून उपेक्षित असणारी 22 गावे, तसेच पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगधंदे हे दोन महत्वाचे प्रश्‍न तालुक्‍यासमोर आहेत. इंदापूर तालुक्‍यात कोणतीही मोठी संस्था राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात नसताना आमदार भरणे यांनी तब्बल दोनदा पक्षाला चांगले दिवस आणल्यामुळे अधिकची ताकत आमदार भरणे यांच्यामागे राष्ट्रवादी कॉंग्रेस उभी करणार आहे. त्यामुळे मंत्रिपद तर आमदार भरणे यांना मिळेलच मात्र कॅबिनेट दर्जाचे की राज्यमंत्री अशी चर्चा इंदापूर तालुक्‍यात रंगू लागली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने व तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी इंदापूर तालुक्‍याला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून मंत्रिपदाचा मान मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.

आमदार दत्तात्रय भरणे हे राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री झाले तर पुणे जिल्ह्यातील किमान दोन ते तीन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचाराचे कायमचे होऊ शकतात. त्यामुळे आमदार भरणे यांना मंत्रिमंडळातील त्याच ताकतीचे पद देण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे.

इंदापूर तालुक्‍यातील प्रत्येक गावातील नागरिक आमदार भरणे मंत्री होतील, तालुक्‍याचे कल्याण होईल. या अपेक्षेने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे भरणे यांना मंत्री करण्यासाठी साकडे घालत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.