फ्लोरीडा – भारत व वेस्ट इंडीज संघातील खेळाडूंना अमेरिकेचा व्हिसा मिळाल्यामुळे या दोन संघात येथील लॉडरहिल मैदानावर दोन्ही टी-20 सामने होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर असून, शनिवारी(दि.06) चौथा सामना जिंकून मालिकाही खिशात टाकण्यासाठी खेळाडू सज्ज बनले आहेत.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज
वेळ – संध्याकाळी 8 वाजल्यापासून
ठिकाण – लॉडरहिल मैदान, फ्लोरीडा
थेट प्रक्षेपण – डीडी स्पोर्टस नेटवर्क
भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिका जिंकल्यावर भारतीय संघ टी-20 मालिकेतही विजेता ठरेल असेच चित्र आहे. आता चौथा व पाचवा टी-20 सामना याच मैदानावर होणार असून, त्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत सहभागी होणार आहे.
आयसीसीच्या योजनेनुसार ज्या देशात क्रिकेट फारसे लोकप्रिय नाही तेथेच आगामी काळात सामने आयोजित केले जाणार असल्याने अमेरिकेत होत असलेल्या या दोन्ही सामन्यांकडून आयसीसीसह सर्व देशांची क्रिकेट मंडळे मोठी अपेक्षा ठेवून आहेत.
भारतीय पाठीराखे आज जवळपास प्रत्येक देशात स्थलांतरित व स्थायिक झाले असल्याने अनेक देशात आता आगामी काळात क्रिकेट लोकप्रिय करण्याचे हे प्रयत्न यशस्वी होतील, असा विश्वासही आयसीसीला वाटत आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना वेस्ट इंडीजने जिंकला. तिसरा सामना जिंकत भारताने मालिकेत आघाडी घेतली असून, हा चौथा सामना जिंकत अखेरच्या सामन्यापूर्वीच मालिका विजय प्राप्त करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य राहणार आहे.