IND vs SL 2nd ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी कोलंबोमध्ये खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 9 गडी गमावून 240 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 42.2 षटकांत केवळ सर्वबाद 208 धावा करू शकला.
श्रीलंकेने यासह हा सामना 32 धावांनी जिंकून मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली आहे. यापूर्वी 2 ऑगस्टला खेळवण्यात आलेला पहिला सामना बरोबरीत सुटला होता. आता भारताची नजर मालिका बरोबरीत सोडवण्याकडे असेल. तिसरा सामना 7 ऑगस्ट रोजी होणार आहे ज्यामध्ये टीम इंडिया कोणत्याही किंमतीत जिंकणं गरजेचे असणार आहे.
आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला काही विशेष कामगिरी करता आली नाही. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर भारताची फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी कोसळली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शानदार सुरुवात केली. मात्र यानंतर विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी निराशा केली. अक्षर पटेलने 44 धावांची चांगली खेळी केली असली तरी दुसऱ्या बाजूकडून फलंदाज पॅव्हेलियनकडे जात राहिले. परिणामी भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 97 धावांची मोठी भागीदारी झाली. 44 चेंडूत 64 धावा करून कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्याने 29 चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 57 वे अर्धशतक झळकावले. तर गिल 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
या सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा निराशा केली. केवळ 14 धावा खेळून तो बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेल याने धुरा संभाळली. त्याने 44 धावांची खेळी खेळली. मात्र, असलंकाने त्याला 34व्या षटकात बाद करत भारताची विजयाची आशा संपुष्टात आणली. या सामन्यात शिवम दुबेने शून्य, श्रेयस अय्यरने सात, केएल राहुलने शून्य, वॉशिंग्टन सुंदरने 15, सिराजने चार, अर्शदीप सिंगने तीन आणि कुलदीप यादवने नाबाद सात धावा केल्या.
श्रीलंकेच्या जेफ्री वँडरसनच्या फिरकीसमोर सर्वच भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारल्याचं दिसून आलं. यजमान श्रीलंकेसाठी जेफ्री वँडरसन सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकात 33 धावा देत एकूण 6 बळी घेतले तर चरिथ असलंकाने तीन बळी घेतले. त्याने 6.2 षटकात 20 धावा दिल्या.
Sri Lanka win the 2nd ODI by 32 runs.#TeamIndia will look to bounce back in the 3rd and Final #SLvIND ODI.
Scorecard ▶️ https://t.co/KTwPVvU9s9 pic.twitter.com/wx1GiTimXp
— BCCI (@BCCI) August 4, 2024
तत्पूर्वी, अविष्का फर्नांडो आणि कामिंदू मेंडिस यांच्या शानदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 50 षटकांत आठ गडी गमावून 240 धावा केल्या होत्या. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मोहम्मद सिराजने मागच्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या पथुम निसांकाला गोल्डन डकचा बळी बनवले. मात्र त्यानंतर अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस यांच्यात 74 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. पण फर्नांडो आणि मेंडिस यांनी 5 धावांच्या अंतराने आपापल्या विकेट गमावल्या, त्यामुळे श्रीलंकेच्या संघाची धावसंख्या 3 विकेटवर 79 धावा झाली होती. मधल्या फळीत कर्णधार चारिथ असालंका आणि सदिरा समरविक्रमा आणि जेनिथ लियानागे यांनीही चांगली सुरुवात केली, पण त्यांना मोठा डाव खेळता आला नाही.
एकवेळ श्रीलंकेने 136 धावसंख्येवर 6 विकेट गमावल्या होत्या, मात्र पुन्हा एकदा खालच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी श्रीलंकेच्या संघाची धुरा संभाळली. खालच्या मधल्या फळीत फलंदाजी करताना प्रथम डुनिथ वेल्लालाघे आणि कामिंदू मेंडिस यांच्यात 72 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर, मेंडिस आणि अकिला धनंजय शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिले, ज्यांनी एकत्रितपणे श्रीलंकेला ऑलआऊट होण्यापासून वाचवले नाही तर 30 महत्त्वपूर्ण धावाही जोडल्या.
पहिली विकेट लवकर पडल्यानंतर यजमान श्रीलंकेने चांगले पुनरागमन केले, मात्र मधल्या षटकांमध्ये सातत्याने विकेट पडल्यामुळे संघाला 250 धावांपर्यंतही मजल मारता आली नाही. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने सर्वाधिक धावा केल्या, ज्याने 62 चेंडूत 40 धावा केल्या. दुनिथ वेल्लालाघेने पुन्हा एकदा जबाबदार खेळी करत 35 चेंडूत 39 धावा केल्या, तर कामिंदू मेंडिसनेही 40 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. कर्णधार चरिथ असलंका 42 चेंडूत 25 धावांची खेळी केली तर अकीला धनंजय याने 15 धावांचे योगदान दिले.
भारताच्या गोलंदाजीवर नजर टाकली तर वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक विकेट घेतल्या. सुंदरने 10 षटकात केवळ 30 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले. कुलदीप यादवनेही घातक गोलंदाजी करत 10 षटकात 33 धावांत 2 बळी घेतले. त्याच्याशिवाय मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.