वेलिंग्टन – टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने बेंगळुरू, पुणे व मुंबई कसोटीमध्ये भारताला ३-० असे नमविले होते. त्यामुळे भारताला मायदेशात क्लीन स्वीप देणारा न्यूझीलंड पहिला पाहुणा संघ ठरला होता. भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर देखील न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमने भारतीय संघ लवकरात लवकर पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त केला.
नुकताच न्यूझीलंडचा संघ मायदेशात परतला असून, मायदेशात परातल्यानंतर लॅथम म्हणाला, भारतामध्ये क्रिकेट खेळणे एक वेगळा अनुभव आहे. पराभवाने भारतीय संघ निराश झाला असेल मात्र अजूनही तो संघ चांगला आहे. एक मालिका गमावल्याने एका रात्रीत संघ खराब होत नाही. परिस्थिती बदलण्यात भारतीय संघ यशस्वी होईल, असा विश्वास लॅथमने व्यक्त केला.
न्यूझीलंडचा संघ भारतात येण्यापूर्वी श्रीलंकेकडून २-० असा पराभूत झाला होता. यासंदर्भात बोलताना लॅथम म्हणाला, श्रीलंकेमध्ये परिस्थिती एकदम विपरीत होती. एकही गोष्ट आमच्या मनाप्रमाणे होत नव्हती. मात्र भारतात दाखल झाल्यानंतर परिस्थिती बदलली, त्यामुळे ही मालिका जिंकणे आमच्यासाठी खास आहे.
इंग्लंडचे आव्हान वेगळ्याप्रकाराचे
भारताला नामविण्याऱ्या न्यूझीलंड संघाला घराच्या मैदानावर इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे. इंग्लंडचा सामना करणे हे वेगळ्या प्रकारचे आव्हान असणार आहे. इंग्लंड विरुद्ध खेळताना मैदान कोणतेही असो त्या लढती रोमांचक होतात. त्यामुळे आगामी मालिका देखील तशाच प्रकारची असणार आहे, असे लॅथमने बोलताना सांगितले.