India vs New Zealand 3rd Test in Mumbai – न्यूझीलंड विरुद्धची मायदेशात मालिका गमावणाऱ्या भारतीय संघाने फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. तिसऱ्या कसोटीतही खेळपट्टी फिरकीपटूना साजेसी असल्याची चर्चा आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली हे अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या व अंतिम लढतीमध्ये किमान विजय मिळविण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करेल अशी आशा आहे.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताची आघाडीची व मधली फळी साफ कोसळली. त्यामुळे भारताला न्यूझीलंड विरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाला केवळ ४६ धावांवर रोखण्यात न्यूझीलंडला यश मिळाले होते. पुणे कसोटीत तर भारतीय फलंदाज मिचेल सँटनरच्या फिरकीवर अक्षरशः नाचत होते. सँटनरने पुणे कसोटीत तब्बल १३ भारतीय फलंदाज तंबूत पाठविण्यात यश मिळविले होते. त्यामुळे फिरकीपटू विरुद्ध चांगली कामगिरी करता यावी, यासाठी भारतीय संघाने बुधवारी कसून सराव केला.
बुधवारच्या सराव सत्रामध्ये भारतीय खेळाडूंनी सराव करताना चार सराव जाळ्यांवर अतिरिक्त पांढऱ्या रेषा काढण्यास सांगितले. हे सर्वसाधारणपाने फलंदाजांना चेंडूची लाईन व लेंथ समजावी या उद्देश्याने केले जाते. बंगळुरू कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांनी सरळ रेषेतील उसळत्या चेंडूवर आपल्या विकेट्स फेकल्या होत्या. पुण्यातील कसोटीमध्ये तर सँटनर करत असलेल्या गोलंदाजीचे कोणत्याही फलंदाजाकडे उत्तर देखील नव्हते. सँटनरचे वळणारे चेंडू कोणते आणि सरळ पडणारे चेंडू कोणते यामध्येच भारतीय फलंदाजांची गल्लत होत होती. यामुळेच भारतीय फलंदाज सँटनरच्या फिरकीच्या जाळ्यात अलगद अडकले.
हातावर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक
दोन कसोटीत पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीमध्ये तयारीसह उतरावे असे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना वाटणे स्वाभाविक आहे. मात्र ज्या प्रकारे फिरकीसमोर भारतीय फलंदाजाना त्रास झाला, त्यावर मात्र सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर म्हणाले की, जेव्हा काही चेंडू वळतात व काही चेंडू सरळ जातात, त्यावेळी गोलंदाजाच्या हातावर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कोणता चेंडू हातातून कशा प्रकारे बाहेर पडतो, ते समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गोलंदाज हे अनेकदा तुमच्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न करतो, अशा वेळी तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम असायला हवे, असे अभिषेक नायर म्हणाले.
नेट बॉलर्सचा ताफा
वानखेडेवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनाने ३५ नेट बॉलर्सला गोलंदाजीसाठी पाचारण केले होते. त्यापैकी बहुतांशी फिरकीपटू होते. पहिल्या दिवसापासून खेळपट्टी रंग दाखविण्यास सुरुवात करेल व फिरकीपटूना साथ देईल, अशी खेळपट्टी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संघ व्यवस्थापनाने मुंबई क्रिकेट संघटनेला देखील याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. बुधवारच्या सरावासाठी पूर्ण फिरकीपटूंचा संघ नियुक्त करण्यात आला होता. संघ व्यवस्थापनाने यापूर्वीच खेळाडूंना वैकल्पिक सराव रद्द करून सर्व खेळाडूंनासाठी सरावसत्र अनिवार्य केले होते.