IND vs NZ 3rd Test (Day 1,R Ashwin ) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले. रवींद्र जडेजाने पाच किवी फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, तर वॉशिंग्टन सुंदरलाही चार विकेट्स आपल्या नावावर करण्यात यश आले. मात्र, आर अश्विनला एकही विकेट मिळाली नाही. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ऑलआऊट झाला असतानाही अश्विनला एकही विकेट घेता आली नसल्याची कसोटी क्रिकेटमध्ये ही पहिलीच वेळ आहे.
अश्विनसोबत पहिल्यांदाच असे घडले….
जडेजा आणि सुंदरच्या फिरत्या चेंडूंमुळे किवी फलंदाज असह्य झालेले दिसले त्याच वानखेडेच्या खेळपट्टीवर 14 षटकांचा स्पेल टाकूनही आर अश्विनची झोळी रिकामीच राहिली. फिरकीपटूंनी दहापैकी 9 विकेट घेतल्या, पण अश्विनच्या फिरकीची जादू चालू शकली नाही.
न्यूझीलंडचा संपूर्ण संघ बाद होऊनही अश्विनला एकही विकेट घेता आली नसल्याची कसोटी क्रिकेटमध्ये ही पहिलीच वेळ आहे. याआधी कसोटीत भारताविरुद्ध जेव्हा जेव्हा संपूर्ण किवी संघ एका डावात ऑलआऊट व्हायचा तेव्हा अश्विनच्या खात्यात प्रत्येक वेळी कमीत कमी एक तरी विकेट जमा होत असत.
जडेजाची दमदार कामगिरी….
अश्विनला एकही विकेट मिळाली नसली तरी त्याचा साथीदार रवींद्र जडेजाने आपल्या फिरकीच्या जोरावर किवी फलंदाजांना नाचायला लावले. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात जडेजाने विल यंग (71), टॉम ब्लंडेल (0), ग्लेन फिलिप्स (17), इश सोधी (7) आणि मॅट हेन्री (0) यांचे बळी घेतले. पुणे कसोटीत चांगलाच महागडा ठरलेल्या जडेजाने मुंबई कसोटीत मात्र 22 षटकांत 65 धावांत 5 बळी घेत न्यूझीलंडला 235 धावांच्या लक्ष्यापर्यंत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.