IND vs NZ 1st Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बेंगळुरू येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेल्याने दुसऱ्या दिवशी नाणेफेक होऊ शकली. या सामन्यात न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. मॅट हॅन्री व विल्यम ओ’रुर्क यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी अक्षरशः भुईसपाट झाली.
न्यूझीलंडनं भारताचा पहिला डाव 31.2 षटकांत केवळ 46 धावांमध्ये संपुष्टात आणला. न्यूझीलंडकडून मॅट हॅन्री याने 13.2 षटकात 15 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय विल्यम ओ’रुर्क याने त्याला सुरेख साथ देत 12 षटकात 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. साउदीला रोहित शर्माच्या रुपात एक विकेट मिळाली.
रिषभ पंतनं 49 चेंडूत केलेल्या 20 धावा ही भारतीय संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याच्याशिवाय सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने 63 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 13 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकलाही दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही. विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना तर खातेही उघडता आले नाही.
कोहलीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली खातेही न उघडता बाद झाला होता. यादरम्यान त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. भारतासाठी सर्वाधिक शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराट कोहली आपल्या कारकिर्दीत 38 वेळा खाते न उघडता बाद झाला आहे. या यादीत झहीर खान (43) पहिल्या तर इशांत शर्मा (38) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर हरभजन सिंग (37) चौथ्या क्रमाकांवर आहे.
Virat Kohli tops the unwanted list alongside Tim Southee 👀🏏#India #Cricket #ViratKohli #Sportskeeda pic.twitter.com/XzPfFOV2b0
— Sportskeeda (@Sportskeeda) October 17, 2024
आणखी एक लाजीरवाणा विक्रम….
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा सक्रिय खेळाडू बनला आहे. न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो 38व्यांदा शून्यावर बाद झाला. या लाजिरवाण्या विक्रमात त्याने किवी संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊदीची बरोबरी केली आहे. सौदीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 38 वेळा शून्यावर बाद झाला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा (33) तर जॉनी बेअरस्टो (32) तिसऱ्या स्थानावर आहे.