बर्मिंगहॅम – ज्यो रूट व जॉनी बेअरस्टो यांच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर यजमान इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीत 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह त्यांनी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली. या मालिकेतील एक सामना अनिर्णित राहिला होता. इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जॉनी बेअरस्टो याने या कसोटीच्या दोन्ही डावात शतकी खेळी केली. सर्वाधिक धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने मायदेशात मिळवलेला सर्वात मोठा व विक्रमी विजय ठरला. तसेच भारताला 15 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी होती, पण भारतीय संघाने ती गमावली.
भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांवर गुंडाळत 132 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या डावात भारताची घसरगुंडी उडाली व त्यांचा डाव 245 धावांवर संपला. इंग्लंडसमोर दुसऱ्या डावात ही कसोटी जिंकण्यासाठी 378 धावा करण्याचे आव्हान होते.
अलेक्स लीस व जॅक क्राऊली या त्यांच्या सलामीवीरांनी शतकी सलामी दिली. मात्र, त्यानंतर त्यांचे 3 फलंदाज बाद झाले व त्यांची अवस्था बिनबाद 107 वरून 3 बाद 109 अशी बिकट बनली होती. मात्र, त्याचवेळी ज्यो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी अफलातून फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. या जोडीने अडीचशेपेक्षा जास्त धावांची अखंडित भागीदारी केली.
या दोघांनीही आपापली शतके पूर्ण केली. रूटने 142 तर बेअरस्टोने 114 धावांची नाबाद खेळी केली. बेअरस्टोने पहिल्या डावात 106 धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावातही त्याने शतक फटकावले व एकाच कसोटीच्या दोन्ही डावांत शतक साकार करण्याचा विक्रम साकार केला.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 416. इंग्लंड पहिला डाव – 284 धावा. भारत दुसरा डाव – 245. इंग्लंड दुसरा डाव – 76.4 षटकांत 3 बाद 378 धावा. (अलेक्स लीस 56, जॅक क्राऊली 46, ज्यो रूट नाबाद 142, जॉनी बेअरस्टो नाबाद 114, जसप्रीत बुमराह 2-74).
सुटले झेल, चुकले निर्णय
भारतीय संघ पहिले तीन दिवस या कसोटीवर पकड मिळवून होता. मात्र, दुसऱ्या डावात प्रमुख फलंदाजांनी केलेली निराशा संघाला भोवली. तसेच इंग्लंडचा दुसरा डाव सुरू असताना हनुमा विहारी व यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी सोडलेले झेलही इंग्लंडच्या पथ्यावर पडले. बदली कर्णधार जसप्रीत बुमराह याने स्विंग मिळत असतानाही वेगवान गोलंदाजांऐवजी फिरकी गोलंदाजांना षटके दिली. या सगळ्यामुळेच भारताला पराभवाचा सामना करावा लागला.