IND vs AUS 2nd Test (Pink Ball) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची दुसरी कसोटी 06 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवली जाणार आहे. ही कसोटी दिवस-रात्र स्वरूपाची असून यासाठी गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येईल. पर्थमध्ये या मालिकेतील पहिली कसोटी नियमित लाल चेंडूने खेळली गेली. अशा परिस्थितीत दोन्ही संघांसाठी ॲडलेड कसोटी सोपी नसेल. चला तर मग जाणून घेऊया, लाल आणि गुलाबी चेंडूमध्ये काय फरक आहे आणि गुलाबी चेंडू लाल चेंडूपेक्षा कसा वेगळा आहे.
गुलाबी चेंडू वेगळा कसा आहे?
दिवस-रात्र कसोटी सामन्यात गुलाबी चेंडू वापरला जातो. कारण रात्रीच्या वेळी दिव्याखाली गुलाबी चेंडूची दृश्यमानता लाल चेंडूपेक्षा चांगली असते. लाल चेंडूच्या तुलनेत गुलाबी चेंडूला विशेष आवरण असते. या लेपला पॉलीयुरेथेन कोटिंग म्हणतात. लाल चेंडूचा रंग चामड्यात शोषला जातो, तर गुलाबी चेंडूचा रंग कारवरील पेंटप्रमाणे कोटिंगच्या स्वरूपात असतो.
एक गुलाबी चेंडू बनवण्यासाठी 7-8 दिवस लागतात. लाल चेंडूचे लेदर रंगविण्यासाठी सामान्य प्रक्रियेचा वापर केला जातो. परंतु गुलाबी रंगाचा चेंडू गुलाबी रंगाच्या अनेक स्तरांसह लेप केला जातो, म्हणून तो तयार होण्यासाठी एक आठवडा लागतो.
याच्या मदतीने चेंडू जास्त काळ चमकदार ठेवता येतो. जितकी चमक जास्त वेळ टिकते तितका चेंडू जास्त स्विंग होतो. गुलाबी चेंडू 40 षटकांपर्यंत सहज स्विंग करता येतो. कधीकधी चेंडू 40 षटकांनंतरही चेंडूला स्विंग मिळते. मग चेंडू जुना झाल्यास रिव्हर्स स्विंग मिळण्याची शक्यता असते.
लाल चेंडू पांढऱ्या धाग्याने तर गुलाबी चेंडू काळ्या धाग्याने शिवलेला असतो. चांगल्या दृश्यमानतेसाठी अशाप्रकारे धाग्यानं शिलाई केली जाते. चांगल्या गोष्टींच्या बरोबरीने गुलाबी चेंडूमुळे एक समस्यादेखील जाणवते. ज्या खेळाडूंना रंगदृष्टीची समस्या आहे, अशा खेळाडूंना या चेंडूची लाइन आणि लेंथचे आकलन करणे कठीण जाते.
गुलाबी चेंडूवर यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीची प्रतिक्रिया…
ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरी गुलाबी चेंडूबद्दल बोलताना म्हणाला की, “या चेंडूने खेळण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत चेंडू पाहावा लागतो. याशिवाय, तो म्हणाला की, “या चेंडूने यष्टीरक्षण करणे खूप वेगळ अन् कठिण असते, कारण गुलाबी चेंडूला जास्त चमक आहे.”