IND vs AUS 2nd Test (Day 2) – पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांचे पानिपत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सावध परंतु आश्वासक सुरुवात करताना १ बाद ८६ धावांपर्यंत मजल मारली होती. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील दुसऱ्या दिवसावर मात्र ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व राहिले. भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेल्या ट्रेव्हिस हेडची शतकी खेळी, त्याला मार्नस लबुशेनने अर्धशतकी खेळी करताना दिलेली सुरेख साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३३७ धावांचा डोंगर उभारला. भारताच्या दुसऱ्या डावाला देखील कर्णधार कमिन्स आणि नवख्या स्कॉट बोलंडने खिंडार पाडले. दिवसअखेर भारतीय संघाने ५ बाद १२८ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत परतल्याने नाबाद राहिलेले ऋषभ पंत आणि नितीशकुमार रेड्डी तिसऱ्या दिवशी किती वेळ भारताचा डाव लांबवितात, हे महत्वाचे आहे. अजूनही कांगारुंकडे पहिल्या डावातील २९ धावांची आघाडी शिल्लक आहे.
पहिल्या दिवशीच्या १ बाद ८६ पासून ऑस्ट्रेलियाने डावाला सुरुवात केली. मात्र, कांगारूंच्या ९१ धावा झाल्या असताना, मॅकस्विनीला बुमराहने परतीचा रस्ता दाखविला. त्यानंतर आलेला दिग्गज फलंदाज स्टीव्हन स्मिथ (२) देखील झटपट परतला. पहिल्या दिवशी २० धावांवर नाबाद राहिलेल्या मार्नस लबुशेनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर आलेल्या ट्रेव्हिस हेडने आपला धडाका सुरु केला. ट्रेव्हिस हेडने ६३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर देखील त्याचा झंजावात सुरूच राहिला. त्याने १११ चेंडूत आपले शतक पूर्ण करताना १० चौकार व ३ षटकार ठोकले. इतर फलंदाज ठराविक अंतराने बाद होत असताना हेड थंड डोक्याने भारतीय गोलंदाजांची पिसे काढत होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा धावफलक देखील सातत्याने धावत होता.
‘लोकल बॉय’ असणाऱ्या ट्रेव्हिस हेडची दमदार खेळी मोहम्मद सिराजने संपुष्टात आणली. भन्नाट यॉर्करवर त्याने हेडचा त्रिफळा उडविला. हेड बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३१० धावांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पॅट कमिन्स (१२), मिचेल स्टार्क (१८), स्कॉट बोलंड (०) यांना झटपट बाद करून डाव संपविला. नॅथन लॉयन ४ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराजने प्रत्येकी ४ तर नितीशकुमार रेड्डी व रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
भारताची सुरुवात देखील अडखळतच झाली. यशस्वी जैस्वाल व राहुल यांनी डावाची सुरुवात करताना, १२ धावांची सलामी दिली. राहुल ७ धावा काढून परतला. त्यानंतर यशस्वी देखील २४ धावा करून तंबूत दाखल झाला. रनमशीन विराट कोहलीने ११ धावांचे योगदान दिले. शुभमन गिल २८ धावांवर असताना स्टार्कने त्याचा त्रिफळा उडविला. रोहित शर्मा दिवस संपायला केवळ ३ षटकांचा खेळ बाकी असताना ६ धावा करून तंबूत परतला. १०५ धावांवर भारताची आघाडीची फळी तंबूत स्थिरावली होती. दिवसअखेर ऋषभ पंत २८ तर नितीशकुमार रेड्डी १५ धावांवर नाबाद राहिले.
बाउंसर्स का टाकले नाहीत ? पुजारा
बाउन्सर चेंडूवर ट्रेव्हिस हेड अनेकदा अडचणीत आला आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी बाउंसर्सचा मारा केला नाही, यावरून चेतेश्वर पुजाराने भारतीय गोलंदाजांना खडे बोल सुनावले. हेड ऑफ साईडवर वर्चस्व गाजवितो. दिवसभरात मी केवळ दोन – तीन बाउंसर्स पाहिले. यापूर्वी तो बाउंसर्सवर अडखळला आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना ५ क्षेत्ररक्षक ऑफसाईडला तर ४ ऑनसाईडला ठेवून बाउंसर्सचा मारा करणे अपेक्षित होते, असे पुजारा म्हणाला.
सिराजकडून हेडला ‘सेंड ऑफ’
ट्रेव्हिस हे हा ऍडलेड येथील ‘लोकल बॉय’ आहे. दुसऱ्या दिवशी त्याने १४१ चेंडूत १४० धावांची खेळी केली. मोहम्मद सिराजने त्याला जबरदस्त यॉर्करवर त्रिफळाचित केले. मात्र, त्यानंतर दाखविलेल्या आक्रमकपणामुळे त्याच्यावर टीकेची झोड उडाली. त्रिफळाचित झाल्यानंतर सिराजने डोळे मोठे करताना, हाताद्वारेच तंबूत जाण्याचा इशारा केला. सिराजच्या इशाऱ्यानंतर हेडने देखील त्याचा तेवढेच जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र झालेल्या प्रकारानंतर मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी हुर्ये उडविली.
ते कदाचित विजयापासून दूर गेले आहेत, त्यामुळेच अशी प्रतिक्रिया आली असे मला वाटते. यामुळे मी थोडा निराश झालो असलो, तरी मी स्वतःसाठी पुन्हा उभा राहणार आहे. मात्र, झाल्या प्रकारानंतर देखील आमच्यात कोणत्याच प्रकारचा संघर्ष नाही. – ट्रेव्हिस हेड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू
संक्षिप्त धावफलक :
भारत : पहिला डाव : ४४. १ षटकांत सर्व बाद १८०.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : ८७.३ षटकांत सर्व बाद ३३७ : ट्रेव्हिस हेड १४०, मार्नस लबुशेन ६४, नॅथन मॅकस्विनी ३९, मिचेल स्टार्क १८, उस्मान ख्वाजा १३, ऍलेक्स कॅरी १५, जसप्रीत बुमराह ४-६१, मोहम्मद सिराज ४-९१, नितीशकुमार रेड्डी १-२५, रविचंद्रन अश्विन १-५३.
भारत : दुसरा डाव : दुसरा दिवस अखेर : २४ षटकांत ५ बाद १२८ : यशस्वी जैस्वाल २४, केएल राहुल ७, शुभमन गिल २८, विराट कोहली ११, रोहित शर्मा ६, ऋषभ पंत नाबाद २८, नितीशकुमार रेड्डी नाबाद १५, पॅट कमिन्स २-३३, स्कॉट बोलंड २-३९, मिचेल स्टार्क १-४९.