वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. अशातच रिपब्लिकन पक्षाकडून निवडणुकीसाठी उभे राहिलेले अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वेबसाईटच हॅक झाल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे वेबसाईट हॅक केल्यानंतर हॅकर्सने क्रिप्टो करन्सीच्या स्वरुपात पैसेही मागितले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेचे प्रवक्ते टीम मुर्तो यांनी याविषयी माहिती दिली. “डोनाल्ड ट्रम्प यांची वेबसाईट हॅक झाली होती. वेबसाईट हॅक करण्यामागे कुणाचा हात होता? हॅकर्सचा मुख्य स्त्रोत कुठे आहे?, या सर्व प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांच्या मदतीने आम्ही शोधत आहोत. आमच्याकडची संवेदनशील माहिती आम्ही साईटवर अपलोड केलेली नव्हती. त्यामुळे आमच्याकडचा डेटा एकदम सुरक्षित आहे. काही काळानंतर हॅकर्सने ट्रम्प यांची वेबसाईट पुन्हा पुर्वरत केली.”
डोनाल्ड ट्रम्प यांची वेबसाईट हॅक केल्यानंतर हॅकर्सने ट्रम्प यांच्यावर वेगवेगळे आरोप केले. त्याने हे सर्व आरोप ट्रम्प यांच्या वेबसाईटवर लिहिले. तसेच ट्रम्प यांच्याकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या संपूर्ण विश्वाने पाहिल्या आहेत. आता खरं काय ते जाणून घेण्याची वेळ आली आहे. असंही हॅकर्सने ट्रम्प यांच्या वेबसाईटवर लिहीलं.
हॅकर्सने ट्रम्प प्रशासनावर अनेक गंभीर आरोप केले. ट्रम्प यांच्याकडून या निवडणुकीत घातपात केला जात आहे; तसेच कोरोनाचा उगम ट्रम्प प्रशासनामुळेच झाला, असे अनेक गंभीर आरोप या हॅकर्सने केले आहेत. तसेच आम्ही केलेल्या सर्व आरोपांचे पुरावेही आमच्याकडे असल्याचा दावा या हॅकर्सने केला आहे. कालांतराने त्यांनी ही वेबसाईट पुन्हा ट्रम्प प्रशासनाला सुपूर्त केली.