पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या विद्यमान नगरसेविका अर्चना तानाजी बारणे यांचे मंगळवारी (दि.13)उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. गेली काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
अर्चना बारणे या प्रभाग क्रमांक 23, शिवतीर्थनगर, समर्थनगर, केशवनगरमधून भाजपच्या चिन्हावर पहिल्यांदाच निवडून आल्या होत्या. त्यांनी स्थायी समितीचे सदस्यत्व आणि “ग’ प्रभाग कार्यालयाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच महापालिका पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.
कायम प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात राहणाऱ्या आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या नगरसेविका अर्चना बारणे यांच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्यातच त्यांनी प्रभागात फिरुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.
स्मार्टसिटीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचा चवथा वर्धापन दिन मंगळवारी (दि.13)सायंकाळी पाच वाजता पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या ऑटोक्लस्टर येथील कार्यालयात आयोजित केला होता. मात्र, विद्यमान नगरसेविका अर्चना बारणे यांचे निधन झाल्याने त्यांना श्रध्दांजली वाहून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.