सर्व्हिस अपार्टमेंट्सचा वाढता ट्रेंड (भाग-१)
लक्षात ठेवा
निवासी भागात सर्व्हिस अपार्टमेंट सुरू करण्याचा अर्थ आपण त्या वास्तूचा व्यवसायासाठी उपयोग करत असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे आपल्याला महापालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहते. तसेच हौसिंग सोसायटीची परवानगी, वीज, पाणी, पार्किंग यासारख्या सुविधांचा व्यवसायासाठी उपयोग करताना त्याची परवानगी घेणेदेखील बंधनकारक असते. एखाद्या वास्तूत व्यवसाय केला जात असेल तर करआकारणीच्या रचनेत बदल होते. त्याबाबत पालिकेकडून माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. या सर्व बाजूंचा विचार करून सर्व्हिस अपार्टमेंटची सुरुवात करावी. अन्यथा कालांतराने सरकारी किंवा खासगी अडचणींमुळे आपला व्यवसाय अपयशी ठरू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, मोठ्या शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे सर्व्हिस अपार्टमेंटला मागणी वाढत चालली आहे. गुरुग्राम सारख्या शहरात अशा प्रकारचा ट्रेंड दिसून येत आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्याला चोवीस तास सुसज्ज सेवा मिळतात. कॉर्पोरट कंपन्यात सर्व्हिस अपार्टमेंटला मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक डेव्हलपर्स देखील या क्षेत्रात सक्रिय होत चालले आहे. नागरिकांच्या क्रयक्षमतेतही वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या गुणवत्तेचा अनुभव घेणारे आणि चांगले उत्पन्न मिळवणाऱ्या गटांसाठी सर्व्हिस अपार्टमेंट संकल्पना उत्तम ठरत आहे.
स्थान
व्यापारी केंद्र किंवा माहिती आणि तंत्रज्ञानाचे केंद्र असलेले शहर किंवा भाग हे सर्व्हिस अपार्टमेंटसाठी सर्वोत्तम ठिकाण ठरू शकते. हीच गोष्ट भाड्याच्या रूपातून देण्यात येणाऱ्या हॉस्टेललाही लागू होते. विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल सुरू करायचे असेल तर त्यासाठी शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, क्लास परिसरात असणे गरजेचे आहे. सध्या सर्व्हिस अपार्टमेंटला सर्वाधिक मागणी आणि विकासदर हा बंगळुरू, पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबादसारख्या शहरात आहे.
फ्लॅटमध्ये सर्व्हिस अपार्टमेंट : एखादा फ्लॅट हा सर्व्हिस अपार्टमेंटच्या रूपातून भाड्याने देणे म्हणजे ते संपूर्णपणे सर्व्हिस अपार्टमेंट आहे, असे गृहित धरणे चुकीचे आहे. एक सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये एकापेक्षा अधिक फ्लॅट आणि त्यात स्वयंपाकघर, कुक, हाऊस किंपिंग, लॉंड्री स्टाफ असणे गरजेचे असते. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास सर्व्हिस अपार्टमेंट हे हॉटेलप्रमाणेच असेल, मात्र, किमतीत बराच फरक असतो. यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. जसे की आगीपासून बचाव आणि ते चालवण्यासाठी आवश्यक असलेला रेस्टॉरंटचा परवाना.
सुविधांकडे लक्ष
एखाद्या कुटुंबाला फ्लॅट भाड्याने देताना ते घर सुस्थितीत आहे की नाही हे तपासले जाते. वीज, पाणी व्यवस्था, भिंतीचा दर्जा, फर्निचर, टॉयलेट-बाथरुम याबाबत विशेष काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे सर्व्हिस अपार्टमेंटच्या रुपाने सेवा देताना सुरक्षादेखील तितकीच महत्त्वाची आहे. जेव्हा एखादी महिला भाडेकरू असेल तर अशावेळी सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशनही करणे गरजेचे आहे. जर चारजण भाडेकरू म्हणून राहात असतील तर आपल्याला दोन डबल बेड किंवा चार सिंगल बेड, चार कपाट, एक स्वच्छ स्वयंपाकघर, एक टीव्ही संच, एक फ्रीज उपलब्ध करून द्यावे लागेल.
– कमलेश गिरी