समुपदेशक पदाच्या 40 जागांकरिता 1500 पेक्षा अधिक अर्ज
पिंपरी – शहरात कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत आहे. यादरम्यान नागरिकांबरोबरच रुग्णांची मानसिकतादेखील ढासळत आहे. करोनाबाधित रुग्णांचे समुपदेशन करुन, दिलासा देत, त्यांना मानसिक आधार देण्याकरिता महापालिकेच्या वतीने समुपदेशकाच्या 40 जागा भरल्या जाणार आहेत. त्याकरिता दिलेल्या जाहिरातीला मोठा प्रतिसाद मिळाला असून, करोनाच्या काळातही या जागांकरिता 1500 पेक्षा अधिक अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.
शहरात वेगाने करोना रुग्ण वाढत आहेत. यामुळे महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांमधील खाटा कमी पडत असल्याने, महापालिका प्रशासनाने ऑटो क्लस्टर, गवळीमाथा येथील बालनगरी व नेहरुनगर येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्याची युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे.
कोविड-19 च्या भीतीमुळे बाधित रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. बहुतांशी रुग्ण हे नकारात्मक विचारांनी त्रस्त आहेत. अनेकदा त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येतो. तसेच रुग्णालयातुन पळून जाण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय उपचारांबरोबरच या रुग्णांना मानसिक बळदेखील देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. त्यामुळे महापालिकेने आता वैद्यकीय समाजसेवा क्षेत्रातील 40 प्रशिक्षित समुपदेशक नियुक्त केले जाणार आहेत. प्रत्येक रुग्णालय अथवा कोविड केअर सेंटरमध्ये तीन या प्रमाणे मानधनावर समुपदेशकांची नियुक्ती केली जाणार आहे.
या समुपदेशकांना कोविडबाधितांशी चर्चा करुन, त्यांचे मानसिक बळ वाढविण्याचे काम करावे लागणार आहे. त्याकरिता उपचाराकरिता दाखल झालेल्या रुग्णांशी दैनंदिन संवाद साधत, त्यांच्या उपचाराची माहिती घेत, त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम करावे लागणार आहे.
लेखी, तोंडी परीक्षेशिवाय होणार नियुक्ती
समुदपदेशकाच्या 40 जागांकरिता 1500 पेक्षा अधिक अर्ज आल्याने भरती प्रक्रियेकरिता लेखी अथवा तोंडी परिक्षा घेतली जाणार नाही. आरक्षणाचे सर्व निकष पाळत, गुणपत्रिकांच्या माध्यमातून अधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची निवड या पदावर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.