विराटच्या नेतृत्वावर वाढतोय दबाव

अजिंक्‍य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्या नावांची होतेय चर्चा

नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला काही काळापासून कर्णधार पदावरून टीका सहन करावी लागत आहे. मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्माने मागील काही वर्षापासून सातत्याने जिंकलेली आयपीएल स्पर्धा व कसोटी उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेने ऑस्ट्रेलियात मिळवलेला मालिका विजयामुळे विराटवर दबाव वाढत आहे. 

विशेषतः अजिंक्‍य रहाणेने कसोटी मालिका जिंकल्यापासून विराट ऐवजी अजिंक्‍यला कसोटी कर्णधार पद देण्यात यावे अशी जोरदार चर्चा सुरू आहे. याचदरम्यान इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर याने एक आक्रमक वक्तव्य केले असून, त्यामुळे विराट कोहलीच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
मॉन्टी पानेसरने एक रोखठोक प्रतिक्रिया दिली असून , त्याच्या मते जर विराट कोहली वनडे विश्‍वचषक किंवा टी-20 विश्‍वचषक जिंकण्यात अयशस्वी ठरला तर त्याने आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा द्यावा.

पानेसर म्हणाला, “हा वाद रंगतदार आहे. माझ्या मते रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे यांच्या कॉम्बिनेशनने उत्तम काम केले आहे. ज्यावेळी त्या दोघांना संधी मिळाली त्यावेळी त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा उठवला आहे. त्यामुळे आता विराट कोहलीवर या दोन कर्णधारांना हाताळण्याची जबाबदारी असेल.”

पुढील टी- विश्‍वचषक तसेच वनडे विश्‍वचषक भारतातच होणार आहे. अशा वेळी यजमान देश म्हणून भारताकडून चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा असतील. त्यामुळे मायदेशात जर विराट हे विश्‍वचषक जिंकू शकला नाही, तर नक्कीच नेतृत्वबदलावर चर्चा केली जाईल.

दरम्यान आगामी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेत विराटच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. प्रत्येक भारतीयाला अपेक्षा आहे की भारतीय संघ विशेष मेहनत न घेता इंग्लंडविरुद्ध मालिका विजय मिळवेल. मात्र जर यात विराटला अपयश आले तर कर्णधार पदावर चर्चा होण्यास आणखी एक मुद्दा निर्माण होईल.
दरम्यान, पुढील महिन्यात इंग्लंडचा भारत दौरा सुरू होणार आहे.

या दौऱ्यात 5 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यत चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यातील पहिले दोन सामने चेन्नई, तर अखेरचे दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. त्यानंतर 12 मार्च ते 20 मार्च या कालावधीत 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहेत. हे सर्व सामने अहमदाबाद येथे खेळले जातील. तर 23 मार्च ते 28 मार्च दरम्यान पुणे येथे 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.

ब्रॅड हॉगकडून पाठराखण
येत्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला हटवण्यात यावे. अन्‌ रहाणेच्याच हाती संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात यावी, अशी मागणीही होत असताना ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॉगने विराट कोहलीची पाठराखण केली आहे. ब्रॅड हॉग म्हणाले, विराट जेव्हा संघाचा कर्णधार असतो तेव्हा तो उत्कृष्ट फलंदाजी करतो. सोबतच पुढे येऊन संघाचे नेतृत्त्वही करतो. रहाणेने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शानदार कामगिरी केली आहे. तो शांत स्वभावाचा व्यक्‍ती आहे. तो कोणत्याही गोष्टीवर जास्त उत्तेजित होत नाही. परंतु जर तुम्ही संघाचा कर्णधारच बदलाल, तर संघाची परंपरा धुळीस मिळेल, असे त्याने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.