शहरात गुन्ह्यांमध्ये वाढ : सुधारगृहातून आलेली मुले पुन्हा गुन्हेगारीकडे वळली
पुणे – शहरात स्ट्रीट क्राईमच्या, घरफोडी, तोडफोड आणि दहशत माजवण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आरोपींचे वय बघता 15 ते 16 वयोगटातील आरोपींचा मोठ्या प्रमाणात समावेश असलेला दिसतो. अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुले सहभागी झालेली दिसतात. सुधारगृहातून आल्यावर ही मुले पुन्हा गुन्हेगारीकडे वळलेली आढळून आली आहेत. गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन आणि तरुण मुलांचा असलेला समावेश विचार करण्याजोगा आहे. मागील काही दिवसांत विविध गुन्ह्यांमध्ये जेरबंद केलेले गुन्हेगारही याच वयोगटातील असलेले दिसतात.
रात्रीच्या वेळी रस्त्यावर लुटमार करणाऱ्या चोरास फरासखाना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्या ताब्यातून लूटलेली रक्कम हस्तगत करण्यात आली. आरफात मक्सुद सय्यद (18, रा. कसबा पेठ), आफताब हासन शेख (20, रा. कसबा पेठ), विक्रांत सुनील टिळेकर (32, रा. शिवाजीनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तसेच फरासखाना पोलिसांच्या पथकाने दुचाकी वाहन चोरणाऱ्या राजेंद्रकुमार नारायणकुमार गुप्ता (20,रा. भवानी पेठ, मुळ उत्तरप्रदेश) याला दुचाकी चोरल्याप्रकरणी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 45 हजार रुपयांचा दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
कोयत्याचा धाक दाखवून लूटणारे जेरबंद
गाड्यांची तोडफोड करून नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवत लुटणाऱ्यांना हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. प्रकाश शिवाजी घाडगे(20,रा.हडपसर), आकाश राजू जाधव(23,रा.हडपसर), अमर दशरथ सकट(20,रा.मांजरी बुद्रुक), दिनेश धनंजय राखपाखरे(19, रा.मांजरी बुद्रुक) आणी ओंकार मंगेश उभे(19,रा.हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
घरफोडी करणाऱ्यांकडून सव्वा तीन लाखांचा ऐवज हस्तगत
भारती विद्यापीठ पोलिसांनी घरफोडी करणाऱ्याकडून 3 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. तसेच भारती विद्यापीठ परिसरातील सात गुन्हे उघडकीस आणले आहेत. अभिषेक सचिन खुटवड(19,रा.खंडोबा मंदिर, कात्रज) असे अटक आरोपीचे नाव आहे.
हत्यार बाळगणारा तरुण जेरबंद
विमानतळ पोलिसांनी हत्यार जवळ बाळगणाऱ्या एका तरुणास जेरबंद केले आहे. त्याच्याकडून कोयता हस्तगत करण्यात आला असून तो भर रस्त्यात कमरेला कोयता लावून फिरत होता. शकील शब्बीर शेख(19,रा.लोहगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.
दहशत माजवण्यासाठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद
दहशत माजवण्यासाठी पिस्तोल बाळगणाऱ्यास जेरबंद करण्यात आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केले. किशोर रामभाऊ चौथे(22,रा.अप्पर शेळके वस्ती) असे अटक आरोपीचे नाव आहे.