वाढती धूळ अन्‌ प्रदूषण जामखेड शहरातील नागरिकांच्या मुळावर

जामखेड  – निकृष्ट रस्त्यांची कामे, रस्त्याच्याकडेला टाकलेली माती यामुळे शहरात आता वाढते प्रदुषण व धुळ नागरिकांच्या आरोग्याला धोका ठरत आहे. शहरातील नगर रोड भाग असो, बीड रोड, खर्डा रोड असो किंवा तहसील कार्यालय परिसर यासह शहरात कुठेही फिरले तर अंगावर धुळीचा थर साचतो. या धुळीमुळे शहरातील नागरिक, व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.

चार जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेले जामखेड शहर हे तालुक्‍याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून विविध कामांनिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या राहते. यासह शहरातून जाणाऱ्या नगर-बीड, शिर्डी -तुळजापूर -हैद्राबाद या मार्गावरुनही मोठी वाहतूक होत राहते. प्रशासनाच्या विविध खात्यांकडे डागडुजीची जबाबदारी असलेल्या विविध रस्त्यांची दुरवस्था व त्यातून या वाहनांची वाहतूक यामुळे धुळीचे लोटचे लोट उठत आहेत. याशिवाय अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी वाळू, खडी, मुरूम टाकून ठेवल्याने शहरातील नगर रोड ते बीड कॉर्नर, बीड रोड हे अंतर पार करेपर्यंत धुळीचा थर वाहनधारक, वाटसरूंच्या अंगावर साचतो.

ज्यांना धुळीची ऍलर्जी आहे, त्यांच्यासाठी तर हा प्रकार अतिशय त्रासदायक ठरत आहे. या धुळीचे लोटचे लोट नाकातोंडात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला एक प्रकारे धोकाच निर्माण झालेला आहे. नगर रोड बीड रोड व खर्डा रोड परिसरातील व्यावसायिक, नागरिकही अतिशय त्रस्त झालेले आहेत. या व्यावसायिकांवर दिवसातील तीन वेळा साफसफाई करण्याची वेळ येऊन ठेपत आहे. अशीच स्थिती उपनगरातील भागातही झालेली आहे. शिवाय तहसील कार्यालय रोड, कोर्ट गल्ली परिसरातही धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

रस्त्यावर विविध वस्तू, पदार्थ विक्री करणारे फेरीवाले, रिक्षाचालक यांना या धुळीचा मोठा फटका बसत आहेत. कान, नाक, घसा, श्‍वसन, फुफ्फुसाचे विकारही या धुळीमुळे जडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या धुळीवर व शहरातील वाढत्या प्रदुषणावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा दिल्लीतील एनसीआर भागाप्रमाणेच शहराची अवस्था बिकट होऊ शकते, यात शंका नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)