विनावाहक बसेसला वाढती मागणी; पण फेऱ्या कमी!

प्रवाशांना स्वारगेट स्थानकात थांबावे लागते ताटकळत : फेऱ्या व बसेसची संख्या वाढविण्याची मागणी

पुणे – स्वारगेट स्थानकातून सातारा, बारामती, भोर या भागात जाण्यासाठी बसची विनावाहक सेवा दिली जाते. मात्र, विनावाहक बसला वाढती मागणी असूनही या बस फेऱ्या कमी प्रमाणात होत असल्याने स्थानकात सतत प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे विनावाहक सेवा देताना बसच्या फेऱ्या व बस संख्या वाढविण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

पुणे शहरात नोकरीनिमित्त सातारा, बारामती, भोर या भागातून दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे या मार्गावर विनावाहक सेवेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, एसटी प्रशासन या मार्गावर कमी प्रमाणात एस. टी बस सोडत असल्याने स्वारगेट आगारात प्रवाशांच्या रांगा लागत असल्याचे दिसत आहे. सद्यःस्थितीत सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत स्वारगेट-सातारा व स्वारगेट-बारामती दरम्यान दिवसभरात सुमारे 30 बस फेऱ्या होतात. तरीही प्रवाशांना बस अपुऱ्या पडत असल्याने या बसची संख्या वाढविण्याची आवश्‍यकता आहे. तसेच स्वारगेट-सातारा व स्वारगेट-बारामती या मार्गावर विनावाहक बसने प्रवास करताना अडीच तास लागतात. मात्र, याच मार्गावर इतर बसने प्रवास केल्यानंतर तीन-साडेतीन तास लागतात. विनावाहक बसने प्रवास केल्यानंतर वेळेत बचत होत असल्याने या बसला प्रवाशांची वाढती मागणी आहे.

आठवड्यातील तीन दिवस स्वारगेट-सातारा या विनावाहक बसने प्रवास करतो. मात्र, या बसचे तिकीट घेण्यासाठी सतत रांग असते. यामुळे एस.टी प्रशासनाने प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बसची संख्या व फेऱ्या वाढविण्याची गरज आहे.
– जय खानविलकर, प्रवासी


स्वारगेट आगारातून सातारा, बारामती या भागात जाण्यासाठी दररोज दर पंधरा मिनिटाला एस.टी बस सोडली जाते. या भागात जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’
– प्रदीपकुमार कांबळे, आगारप्रमुख, स्वारगेट

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.