सातारा – जिल्ह्याच्या पश्चिमेकडील मुसळधार पाऊस आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर ताप, खोकला, कांजिण्या तसेच सध्या मुले हॅंड- फूट- माउथ (एचएफएमडी) या आजाराने हैराण झाली असून याचे प्रमाण वाढत आहे. मात्र या आजारांनी घाबरून न जाता लहान मुलांची काळजी घेऊन या आजारांवर तत्काळ उपचार करावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीसह खासगी बाल रूग्णालयात लहान मुलांच्या उपचारासाठी गर्दी वाढू लागली आहे.
सातारा शहर आणि परिसरात सकाळी उनं व दुपारी मुसळधार पाऊस या विचित्र वातावरणाचा अनुभव येत आहे. आबालवृद्ध व लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला व कांजिण्या याबरोबरच एचएफएमडी या आजाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. या आजारामुळे हात आणि पायाचे तळव्यांवर छोटे-छोटे लालसर फोड येतात, तर तोंडाच्या आतमध्येही व्रण दिसतात. एंटेरो विषाणूंमधून तोंडावाटे पसरणारा हा आजार आहे. या रुग्णांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत काही अंशी वाढ झाली आहे. आपल्याकडे आढळणारा हॅंड- फूट- माउथ आजाराचा विषाणू सौम्य आहे. त्यामुळे याचा संसर्ग झाला तरी त्यातील गुंतागुंत वाढत नाही.
परदेशांमध्ये आढळणाऱ्या या आजाराच्या काही विषाणूंपासून मात्र गुंतागुंत दिसते, अशी माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांसमोर आता ही नवीन डोकेदुखी निर्माण झाल्याचे दिसते. विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी वेळीच उपचार, पाणी उकळून पिणे, सार्वजनिक स्वच्छता, गर्दी टाळणे, घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, लहान मुलांची तपासणी, सकस आहार आदी उपाय बालरोगतज्ज्ञ डॉ. अरूंधती कदम यांनी सुचविले. उपचाराद्वारे हे आजार बरे होतात. तेव्हा पालकांनी घाबरू नये, असे आवाहन त्यांनी केले.
हॅंड- फूट- माउथ या आजाराचे काही रुग्ण आता आढळून येत आहेत. पण, त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. या आजाराचा विषाणू सौम्य आहे. एक-दोन आठवड्यांत आजार बरा होतो. ताप कमी करण्यासाठी औषधे द्यावीत. खाज, आग कमी होण्यासाठी मलम लावावे. तोंडातील व्रणांमुळे गिळायला त्रास होत असल्यास आतून वेगळे मलम लावावे. डायपर बदलून झाल्यावर हात स्वच्छ धुवावेत.
– डॉ. अरुंधती कदम (बालरोगतज्ज्ञ)
हॅंड- फूट- माउथ आजार कसा पसरतो?
हॅंड- फूट- माउथ हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे एकाकडून दुसऱ्या मुलाला याचा सहजतेने संसर्ग होतो. विशेषतः चार ते सहा वर्षे वयोगटातील नर्सरी, ज्युनिअर, सीनियर “केजी’मध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये याचा संसर्ग पटकन होतो. आपल्या मुलाला हे काय नवीन दुखणे झाले आहे, अशी भीती पालकांना वाटत असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले. हॅंड- फूट- माउथ हा आजार एंटेरो विषाणूंपासून होतो. अन्न-पाण्यातून, आजारी मुलाच्या डब्यातले खाऊन आजार पसरतो. हा आजार नवीन नाही. दरवर्षी काही प्रमाणात याचे रुग्ण आढळतात. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून करोना विषाणूंचा उद्रेक सुरू असल्याने हॅंड-फूट-माउथ हा विषाणू आढळला नाही. याला प्रमुख कारण म्हणजे मुलांची शाळा बंद होती.
लक्षणे
सौम्य ताप येतो. हात, पायाच्या तळव्यांवर लालसर फोड येतात. तोंडाच्या आतमध्ये व्रण दिसतात, त्यामुळे गिळायला त्रास होतो. काहींना कोपर, गुडघे यावर फोड येतात, त्यांना खाज सुटते,काहींच्या फोडांना आग- आग होते.