कराडात डेंग्यूसदृश्‍य रुग्णांमध्ये वाढ

कराड – कराड शहर व परिसरातील ढगाळ, दमट हवामान आणि पावसाच्या शिडकाव्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. हे वातावरण आरोग्यास बाधक ठरत असल्याने डेंग्यू सदृश्‍य रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरात डेंग्यू, फ्ल्यु सारख्या साथीच्या रोगांचा फैलाव होऊ लागला आहे. त्यातच शहरातील काही भागात डेंग्यूसदृश्‍य रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्याची परिस्थिती पाहता शहरात डेंग्यूसदृश्‍य रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. येथील सोमवार पेठेत कुंभारवाडा परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती लावून त्यामध्ये दूषित पाणी मिसळल्याने येथे गॅस्ट्रोचा फैलाव झाला होता. त्यामुळे शहरात आधीच शहरात खळबळ उडाली आहे. त्यातच आता येथील वेणूताई चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये डेंग्यू व फ्ल्यु सदृश्‍य रुग्णांची संख्या मोठी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वेणूताई चव्हाण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शिंदे यांनी नागरिकांनी दक्षता घेण्याचे आव्हान केले आहे. त्याचबरोबर डेंग्यू व फ्ल्युु सारख्या साथीच्या रोगांची लक्षणे आढळून आल्यास रुग्णांनी त्वरित उपचार घ्यावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.

शहरात सध्या सुरू असलेल्या पाईपलाईनचे काम सुरु असून त्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यातच पावसाचे व नाल्याचे पाणी साचल्याने दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डासांची पैदास वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यासाठी शहरात नगरपालिकेकडून डास, डासांची पैदास, अंडी, डासांच्या आळ्यांची वाढ रोखण्यासाठी प्रतिबंधक फवारणी करण्याचे काम सुरु आहे.

तसेच नागरिकांनी डेंग्यू व फ्ल्युु सारख्या साठीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी घर, परिसरातील अस्वच्छ वातावरण, टाकावू तयार, नारळाच्या करवंड्या, खड्यांमध्ये साचलेले पावसाचे पाणी, डासांची पैदास होण्यासारखी ठिकाणे नष्ट करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नागरिकांनी आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. डास, अंडी, डासांच्या आळ्यांची वाढ रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. लोकांमध्ये डेंग्यू व फ्ल्युुचा लक्षणांबाबत जागरूकता करावी. या रोगांची लक्षणे आढळल्यास त्वरित बाधित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहनही डॉ. शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)