वाई – वाई नगरपालिकेचा 20 लाख रुपये शिलकी व पाणीकरात 20 टक्के दरवाढ असलेले एकूण 37 कोटी 15 लाखांचा प्रारुप अर्थसंकल्प चर्चेअंती मंजूर करण्यात आला.
या अर्थसंकल्पात शहर सुशोभीकरण, नागरी सुविधा, आरोग्य सुविधा व कृष्णा नदी विकास कामांवर विशेष भर देण्यात आला आहे.
नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत आज 2020-21 चे अंदाजपत्रक मांडण्यात आले. नगरपालिकेला 2020-21 वर्षाकरिताच्या अर्थसंकल्पात शहर स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, वृक्षारोपण यासाठी 11 लाख, कृष्णा नदी परिसर स्वच्छता व विकास 47 लाख, कृष्णा नदी घाट दुरूस्ती 7 लाख, स्मशानभूमी सुशोभिकरण 6 लाख, हुतात्मा स्मारक देखभाल दुरुस्ती 35 लाख, पालिका शाळांचे संगणीकरण 9 लाख, वाहतूक बेट बांधकाम 10 लाख, स्मशानभूमी बांधकाम 10 लाख, सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम व पुनर्वसन 25 लाख, नाल्यांचे बांधकाम 35 लाख, उद्यानांसाठी 25 लाख, स्वच्छ सर्वेक्षण 75 लाख, एसडब्लूएम संग्रहण, वाहतूक व कंपोस्टिंग 100 लाख, पाणी पुरवठा पाईपलाईन, कोटर्स आदींसाठी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यात महसुल अनुदान आठ कोटी 44 लाख, मालमत्ता कर दोन कोटी 96 लाख, पाणी कर एक कोटी 18 लाख, स्वच्छता कर सहा लाख, भाडे उत्पन्न एक कोटी आठ लाख, शुल्क आणि वापरकर्ता शुल्क 62 लाख, अन्य कर, विक्री आणि व्याज 33 लाख, राखीव निधी नऊ लाख असे एकूण 14 कोटी 70 लाख रुपये महसूली उत्पन्न असून आस्थापना खर्च 11 कोटी सहा लाख, प्रशासकीय खर्च एक कोटी नऊ लाख, ऑपरेशन आणि प्रोग्राम चार कोटी 17 लाख, अंमलबजावणीसाठी खरेदी 32 लाख, महसूल अनुदान, सहयोग आणि अनुदान 31 लाख, तरतुदी आणि लेखन बंद 67 लाख असा एकूण महसुली खर्च 17 कोटी 63 लाख रुपये आहे.
महसुली जमा 15 कोटी 12 लाख रुपये असून भांडवली जमा 22 कोटी 2 लाख आहे तर मागील शिल्लक 37 लाख रुपये असे एकूण 37 कोटी 15 लाख रुपयांचा अर्थसंकल्प असून त्यातून महसुली खर्च 17 कोटी 94 लाख, भांडवली खर्च 19 कोटी 38 लाख असा एकूण खर्च 37 कोटी 32 लाख वजा जाता 20 लाख रुपये शिलकी अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, दीपक ओसवाल, महेंद्र धनवे, सौ. वासंती ढेकाणे, सौ. रुपाली वनारसे यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी उत्तरे दिली. त्यांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. नगरसेवक संग्राम पवार, भारत खामकर, दिगंबर बागुल, कांताराम जाधव, राजेश गुरव, सतीश वैराट, सौ. स्मिता हगीर, सौ. प्रियांका डोंगरे, सौ. रेश्मा जायगुडे, सौ. आरती कांबळे, सौ. शीतल शिंदे, सौ. सुनीता चक्के, सौ. सुमैय्या इनामदार आदी उपस्थित होते.
देणी भागवण्याचा चांगला परिणाम
मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी गेल्या दोन वर्षात आर्थिक शिस्तीच्या माध्यमातून उत्पन्नवाढीवर भर देऊन नगरपालिकेचे जवळपास 12 कोटीचे देणे प्राधान्याने देण्यावर भर दिला. त्याचा चांगला परिणाम या वर्षाच्या अंदाजपत्रकावर दिसून आला. त्यामुळे वाहतूक बेट बांधकाम, स्मशानभूमी, शौचालय, नाल्याचे बांधकाम, उद्यानाचे सुशोभिकरण, पाणीपुरवठा योजनेतून पाण्याची टाकी उभारणे यासारखी मोठी कामे यावर्षी प्रस्तावित करण्याची असल्यामुळे सर्व सदस्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच सर्व जमा व खर्चाचे बारकाईने अभ्यास करुन लेखापाल रोशन गायकवाड यांनी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.