वाढीव वाहतूक दंडाचा नेटीझन्सकडून खरपूस समाचार

पुणे – केंद्रीय परिवहन मंत्रालयाने वाहतूक दंडाच्या रकमेत अव्वाच्या सव्वा वाढ केल्यानंतर दंडापोटी केलेल्या कारवाईतील रकमेच्या आकडेवारीसह राज्यातील बातम्या चांगल्याच व्हायरल होत आहेत. या दरवाढीचा नेटीझन्सने खरपूस समाचार घेतला आहे. या कारवाईमुळे निर्माण होणाऱ्या गमतीदार किस्स्यांचा व्यंगचित्रांसह हास्याचे फवारे उडविणाऱ्या अनेक पोस्टनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

देशातील बेशिस्त वाहतूकीला आळा घालण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने वाहतूक दंडाच्या रक्‍कमेत मोठी वाढ केली आहे. अद्यापही पुणे पोलिसांना हे परिपत्रक मिळाले नसल्याने भरमसाठ दंड वसुलीची ही कारवाई सुरू केलेली नाही. मात्र, सोशल मीडियावरील याबाबतच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्या आहेत. वाहतूक कर्मचाऱ्याने रस्त्यावर दंड ठोठविल्यानंतर अगदी नेसलेल्या वस्त्रासह वाहनाची चावी वाहतूक कर्मचाऱ्यांकडे सोपवून निर्धन होऊन वाहतूक दंड भरत असल्याचे व्यंगचित्र चांगलीच करमणूक करत आहे. तर दंडाची रक्‍कम देशातील विकासकामांकरिताच वापरली जाणार असल्याने देशाच्या हितासाठी “देश के हित मे तोडदो सिग्नल’ हा दुचाकीवरील सहप्रवाशाचा खोचक सल्ला नेटकऱ्यांची दाद मिळवत आहे. तर “गाडी तुम्ही चालवत आहात, सरकार नाही.

वाहतुकीचे नियम पाळा; दंडापासून वाचा’ असा सल्लादेखील देण्यास नेटीझन्सने मागे-पुढे पाहिलेले नाही. तर वाहतूक मोडल्यानंतर दंडाची रक्‍कम भरण्यासाठी बॅंकेकडे कर्ज मागणारा वाहनचालक पाहून, ही व्यक्‍ती सर्वसामान्य वाहनचालकांचे प्रतिनिधित्व करत असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्‍त होत आहे.

हसविणाऱ्या तर काही राग दर्शविणाऱ्या पोस्ट
दंडाची रक्‍कम एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढविली आहे की जणू देशातील रस्ते युरोपमधील रस्त्यांसारखे चकाचक आणि खड्डे मुक्‍त असल्याची कोपरखळी मारत, चिखल व खड्ड्यांची वास्तववादी छायाचित्रे पोस्ट केली आहेत. वाहतूक दंडापासून मुक्‍तता मिळविण्यासाठी ऑफीसला जाण्यासाठी चाकरमान्यांनी घोड्याचा वापर करण्याची पोस्ट ही पर्यायी व्यवस्थेचे प्रतीक दर्शवित आहे. तर वाहतूक नियमात आणखी एक बदल करून वाहतूक कर्मचारी लाच घेताना सापडल्यास त्याला 10 लाखांचा दंड ही पोस्ट वाहतूक शाखेकडून होणाऱ्या अन्यायकारक कारवाईबद्दल नेटीझन्सचा राग दर्शविते. अनेक गमतीदार पोस्ट व्हायरल होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)